ऊसगाळप हंगाम अंतिम टप्प्यात

अनिल सावळे
शनिवार, 21 एप्रिल 2018

पुणे - राज्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असून, १८७ साखर कारखान्यांपैकी १५१ कारखान्यांनी गाळप पूर्ण केले आहे. उर्वरित ३६ साखर कारखान्यांपैकी काही कारखाने मेअखेरपर्यंत सुरू राहतील. दरम्यान, पुढील वर्षी उसाचे क्षेत्र तब्बल साडेदहा लाख हेक्‍टर असल्यामुळे कारखान्यांसमोर ऊस गाळपाचे मोठे आव्हान उभे राहणार आहे.

पुणे - राज्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असून, १८७ साखर कारखान्यांपैकी १५१ कारखान्यांनी गाळप पूर्ण केले आहे. उर्वरित ३६ साखर कारखान्यांपैकी काही कारखाने मेअखेरपर्यंत सुरू राहतील. दरम्यान, पुढील वर्षी उसाचे क्षेत्र तब्बल साडेदहा लाख हेक्‍टर असल्यामुळे कारखान्यांसमोर ऊस गाळपाचे मोठे आव्हान उभे राहणार आहे.

राज्यात गतवर्षी उसाचे क्षेत्र नऊ लाख दोन हजार हेक्‍टर इतके होते. साखर उद्योगाने प्रतिहेक्‍टर ७० मेट्रिक टन उत्पादन होईल, असा अंदाज बांधला होता. मात्र, गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे उसाच्या उत्पादकतेत दीडपट वाढ झाली. उसाचे उत्पादन प्रतिहेक्‍टर सुमारे ११० मेट्रिक टनांवर पोचले. राज्यातील १०१ सहकारी आणि ८६ खासगी अशा एकूण १८७ कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला. या कारखान्यांनी १८ एप्रिलअखेर ९४१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, एक हजार ५६ लाख क्‍विंटल साखरेचे उत्पादन घेण्यात आले आहे.

कोल्हापूर विभागात सर्वाधिक उतारा
राज्यातील साखरेच्या सरासरी उताऱ्याचे प्रमाण ११.२२ टक्‍के इतके आहे. त्यात अपेक्षेनुसार सर्वाधिक उतारा कोल्हापूर विभागात १२.४५ टक्‍के, पुणे विभागात ११.१३ टक्‍के, नगर विभाग १०.९० टक्‍के, अमरावती १०.७७, नांदेड विभागात १०.६३, नागपूर १०.५६ आणि औरंगाबाद विभागात ९.९४ टक्‍के इतका उतारा मिळाला आहे.

गेल्या वर्षी 420 लाख क्विंटल साखर
राज्यात गतवर्षी २०१६-१७ च्या गाळप हंगामात १८ एप्रिलअखेर सर्व दीडशे साखर कारखान्यांमधील गाळप पूर्ण झाले होते. गेल्या हंगामात ३७३ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन ४२० लाख क्‍विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. गतवर्षी साखरेचा उतारा ११.२६ टक्‍के इतका होता.

यंदा राज्यात उसाचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे कारखान्यांसमोर ऊसगाळपाचे आव्हान होते; परंतु साखर आयुक्‍तालय आणि कारखान्यांनी योग्य नियोजन केले. तसेच ऊस उत्पादकांना एफआरपी वेळेत मिळावा, यासाठी संबंधित कारखान्यांना सूचना दिल्या आहेत. एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. 
- संभाजी कडू-पाटील, साखर आयुक्‍त.

Web Title: sugarcane galap season in final step