ऊसदर, निर्यातीसाठी अनुदानाचा फायदा

ऊसदर, निर्यातीसाठी अनुदानाचा फायदा

भवानीनगर - केंद्र सरकारने बुधवारी ऊस उत्पादकांसाठी प्रतिटन १३८ रुपयांचे अनुदान व साखर निर्यातीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे साखर उद्योगाने स्वागत केले. या निर्णयाचा फायदा अतिरिक्त साखर निर्यात होण्यासाठी व उसाचा दर देण्यासाठी होईल, असे मत पदाधिकारी व तज्ज्ञांनी व्यक्त केले. 

सन २०१८-१९ च्या हंगामात गाळपास येणाऱ्या उसासाठी प्रतिटन १३८ रुपये आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात थेट जमा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 

येत्या हंगामात शिल्लक १०५ लाख टन साखर व संपूर्ण हंगामात उत्पादित होणाऱ्या ३३५ लाख टन साखरेसह देशात अंदाजे ४४३ लाख टन साखर उत्पादन होणार आहे. त्यामुळे देशांतर्गत वापर सोडून शिल्लक राहणारी १८० लाख टन साखर निर्यातीसाठी बंदर असणाऱ्या राज्यांसाठी प्रतिक्विंटल २५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

दिलीप वळसे पाटील, अध्यक्ष, राष्ट्रीय साखर संघ - केंद्राने उशिरा का होईना महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. निर्यातीसाठी अनुदान मिळणार असले तरी प्रत्यक्षात परदेशातील साखरेच्या किमती कमी असल्याने येणारा अपुरा दुरावा दूर करण्यासाठी केंद्राकडून बिनव्याजी कर्ज मिळाले पाहिजे. यासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला जाईल. 

रोहित पवार, अध्यक्ष, ‘इस्मा’- केंद्र सरकारकडे साखर धोरणाबाबत निर्णय घेण्यासाठी आम्ही अजूनही पाठपुरावा करीतच आहोत. अर्थात आज निर्यातीसाठी सरकारने घेतलेला निर्णय चांगला आहे, फक्त आता यामध्ये साखर कारखान्यांनी योग्य निर्णय घ्यावा. या वर्षीही साखर अधिक उत्पादित होणार आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या निर्णयाची अपेक्षा होती. 


हर्षवर्धन पाटील, माजी सहकारमंत्री - केद्र सरकारने निर्यातीसाठी चांगला निर्णय घेतला, मात्र यामध्ये एक मेख आहे. फक्त घोषणा करून साखर उद्योगाचे प्रश्न सुटणार नाहीत. एकीकडे देशातील जनतेला साखर उद्योगाविषयी आम्ही खूप करीत आहोत, असे केंद्र सरकार भासविणार असेल व प्रत्यक्ष वास्तव मदत करणार नसेल, तर प्रश्न तसेच राहतील. 

अमरसिंह घोलप, अध्यक्ष, श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना
केंद्र सरकारने निर्णय घेतला, तो दिसताक्षणी चांगला वाटत आहे. परंतु मागील पॅकेजप्रमाणे जर फक्त वेष्ठनच चांगले राहिले तर साखर उद्योग आज गंभीर स्थितीत आहे, त्याची स्थिती कायमच राहील. साखर निर्यातीसाठी सरकारने प्रोत्साहन देऊ केले आहे, ते जसेच्या तसे प्रत्यक्षात उतरले पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com