राज्यात ऊसगाळप शुक्रवारपासून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

यंदाचा ऊसगाळप हंगाम शुक्रवारपासून (ता. २२) सुरू होणार आहे. राज्यात सतत पडलेल्या दुष्काळामुळे यंदा उसाचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ५० टक्‍के इतके कमी झाले आहे.

मुंबई - यंदाचा ऊसगाळप हंगाम शुक्रवारपासून (ता. २२) सुरू होणार आहे. राज्यात सतत पडलेल्या दुष्काळामुळे यंदा उसाचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ५० टक्‍के इतके कमी झाले आहे. याचा फटका गाळपावर होणार असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ऊसगाळप जवळजवळ निम्म्याने घटणार आहे. तसेच, हा गाळपाचा हंगामदेखील सर्वांत कमी कालावधीचा राहणार आहे. साखरेचे उत्पादन कमी होणार असले, तरी पुरेशा साखरेचा साठा उपलब्घ असल्यामुळे साखरेचा तुटवडा होणार नाही.

राज्यात सततचा कोरडा आणि ओला दुष्काळ यामुळे सर्व भागात ऊस पिकाचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी झाले आहे. गेल्या वर्षी ११ लाख ६२ हजार हेक्‍टर क्षेत्रांवर ऊस लागवड होती. यंदा ती घटून ८ लाख २२ हजार हेक्‍टर क्षेत्र इतकी कमी झाली. गेल्या हंगामात ९५२ लाख टन ऊस गाळप झाले होते. यंदा ५१८ लाख टन उसाचे गाळप होणार आहे; तर गेल्या वर्षी १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा केवळ ५८ लाख २८ हजार मेट्रिक टन इतके उत्पादन होणे प्रस्तावित आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राज्यात दुष्काळ पडल्यामुळे चारा छावण्या सुरू कराव्या लागल्या होत्या. सगळ्यात जास्त छावण्या मराठवाड्यात होत्या. या छावण्यांत लाखो जनावरे आसऱ्याला होती. त्यांना चारा म्हणून उसाचे वाटप केले जात होते. यामुळे ही उसाचे गाळप कमी होणार आहे. उसाला ‘एफआरपी’ २७ हजार ५०० रुपये इतका मिळत असताना चारा म्हणून शेतकऱ्याला एका टनाला ३००० हजार ते ३५०० रुपये दर मिळत होता.  

साखरेचा साठा पुरेसा
मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील सुमारे पन्नास टक्‍के साखर कारखान्यांना यंदा उस पन्नास टक्‍के इतका कमी मिळणार आहे. यंदा साखरेचे उत्पादन घटले तरी राज्यातील जनतेला पुरेशी ठरेल इतकी साखर सध्या उपलब्ध आहे. राज्यात सध्या ७० लाख टन साखरेचा साठा उपलब्घ आहे. यातील ३५ लाख टन इतका साठा पुरेसा आहे.

पूर, दुष्काळग्रस्तांचे परीक्षा शुल्क माफ
ओला दुष्काळ व पूरग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचे परिपत्रक मुंबई विद्यापीठाने जारी केले आहे. तसेच, वसतिगृह शुल्कही लवकरच माफ करण्याचे आश्‍वासन मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांनी मंगळवारी छात्र भारती विद्यार्थी संघटनेला दिले. ओला दुष्काळ व पूरग्रस्त विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क, शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क आणि वसतिगृह शुल्क सरसकट माफ करावे, या मागणीसाठी छात्र भारती विद्यार्थी संघटनेने मंगळवारी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये उपोषण केले. संघटनेचे मुंबई अध्यक्ष रोहित ढाले आणि समन्वयक श्रीधर पेडणेकर उपोषणाला बसले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sugarcane season will begin on Friday in Maharashtra

टॅग्स
टॉपिकस