राज्यात तीन लाख ऊसतोड मजूर वाढले

sugarcane workers
sugarcane workers

नगर : यंदाच्या पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाला नाही. खरिपासह रब्बीतली पिके वाया गेली, चारा- पाण्याचा प्रश्‍न आताच गंभीर होत असल्याने जनावरे जगायची चिंता लागलेल्या राज्यातील दुष्काळी भागातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा ऊसतोडणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा राज्याभरात सुमारे तीस ते चाळीस टक्के म्हणजे सुमारे तीन लाखाच्या वर ऊसतोडणी मजुरात वाढ झाली आहे.

विशेष म्हणजे दरवर्षी सुमारे दिड लाखावर ऊसलेली उचल यंदा पन्नास हजारावर आली आहे. काही मजुरांनी तर त्याही पेक्षा कमी पैशात ऊसतोडणी करण्याची तयारी दर्शवली आहे. आताचा गावांत पाणी प्यायला नसल्याने मजुरांचे वेगाने साखर करखान्याकडे स्थलांतर होत असल्याने दिवाळीच्या तोंडावर गावेही ओस पडू लागली आहे.

राज्यात आणि राज्याबाहेर जाणारे साधार पंधरा लाख मजुर असतात. त्यातील दहा लाख मजुर राज्यातील दोनशे साखर कारखाना परिसरात ऊसतोडणी करतात. सर्वाधिक पाच ते सहा लाख मजूर बीड जिल्ह्यातील आहेत तर त्याला जोडूनच असलेल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव, जामखेड, नेवासा. कर्जत तालुक्‍यांतील काही भागांतील मजूर ऊसतोडणी करतात. याशिवाय जळगाव, चाळीसगाव, जालना, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोलीसह पश्‍चिम महाराष्ट्रातील सांगली, साताऱ्याच्या दुष्काळी भागातील मजूरही ऊसतोडणी करू लागले आहेत.

मागील दोन वर्षाच्या काळात नगरसह राज्यातील पावसाची परिस्थिती चांगली होती. त्यामुळे सुमारे पंधरा ते वीस टक्के मजुरांच्या सख्येत घट झाली होती. यंदा मात्र परिस्थिती पुन्हा पालटली आहे. राज्यातल्या बहुतांश भागात दुष्काळी स्थिती आहे. पाऊस नसल्याने खरिपाची पिके वाया गेली; रब्बीतही परतीचा पाऊस नसल्याने पिके येतील याची शक्‍यता मावळली आहे. बाजरी नाही, ज्वारी जागेवरच करपत असल्याने चाऱ्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता आहे. भरवशाच्या विहिरींनी सप्टेबर-आक्‍टोबरमध्येच तळ गाठल्याने पिण्याचे पाणी नाही, रोजगाराचे साधन नाही, अशा स्थितीत गावात राहायचे कसे, याची चिंता लागलेल्या अनेक शेतकऱ्यांनी यंदा ऊसतोडणीचा मार्ग पत्कारला आहे.

मजुरांना दर वर्षी मुकादमामार्फत साखर कारखान्यांकडून आगाऊ रक्कम (उचल) दिली जाते. तरुण पिढी ऊसतोडणी करायला तयार नसल्याचे कारण पुढे येत असल्याने आपसूकच उचलीचे दर वाढून दिड लाखावर गेले. यंदा मात्र मजुरांची संख्या तीस ते पस्तीस टक्‍क्‍यांनी वाढली असल्याने मुकादम उचल द्यायला तयार नाहीत. गावांत राहून करायचे तरी काय असा प्रश्‍न असलेल्या शेतकऱ्यांनी ऊसतोडणी करण्याचा निर्णय घेतला असून उचलीचे दर दिड लाखावरुन पन्नास हजारावर आले आहेत. काही तरुणांनी तर त्याही पेक्षा कमी रकमेवर ऊसतोडणी करण्याची तयारी दाखवत कारखाने गाठायला सुरवात केली आहे. यंदा ऊसाचे क्षेत्र जास्ती असल्याचे सांगितले जात असले तरी हुमणीची बाधा, पाणी नसल्याने उत्पादनात घट या कारणाने सांगली, सोलापुर, कोल्हापुर, पुणे जिल्ह्यातील काही कारखाने साधारण पाच महिने तर नगर, मराठवाडा व अन्य भागातील कारखाने चार महिन्यापेक्षा जास्ती काळ चालण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे मार्च नंतर गावी आलेल्या मजुरांच्या रोजगार, पाणी, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न पुन्हा गंभीर होणार आहे.

बैलाचे दर वाढले, ट्रॅक्‍टरचाही वापर
ऊसतोडणी कामगार ऊसवाहतुकीसाठी किमती बैलाची खरेदी करतात. बहुतांश जोड्या लाखाच्या घरात आहेत. यंदा तोडणी मजुरांची संख्या वाढल्याने बैलजोड्यांचे दर वीस टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. किमती बैलांसोबत इतर जनावरे जगवण्यासाठीच तोडणीला जाण्याचा अनेक सुशिक्षित तरुणांनी निर्णय घेतला आहे. शिवाय टायर वाहतुकीसाठी ट्रॅक्‍टरचाही वापर वाढू लागला आहे.

""नगर जिल्ह्याचा पुर्व भाग, मराठवाडा, खानदेश, जळगाव, चाळीसगाव भागातून यंदा मोठ्या प्रमाणात मजुर ऊसतोडणीसाठी निघाले आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे मजुरांच्या सख्येत वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना जनावरे जगवण्याची चिंता असल्याने याआधी कधीही ऊसतोडणी न केलेल्यांनी यंदा ऊसतोडणी करण्याची तयारी दर्शवली आहे.''
- गहीनीनाथ पाटील थोरे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी कामगार, मजुर, मुकादम युनियन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com