विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

राज्यात परभणी, देशात चंद्रपूर सर्वांत उष्ण शहरे

राज्यात परभणी, देशात चंद्रपूर सर्वांत उष्ण शहरे
पुणे - विदर्भात पुढील दोन दिवसांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान खात्यातर्फे मंगळवारी देण्यात आला. पुण्यातही कमाल तापमानाचा पारा चाळिशी ओलांडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात परभणीत सर्वाधिक, म्हणजे 44.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुण्यात कमाल तापमानाचा पारा 39.7 अंश सेल्सिअस नोंदला गेला. राज्यातील सर्वांत कमी किमान तापमानाची (18.2) नोंदही पुण्यात झाली.

देशातील सर्वाधिक उष्ण शहर म्हणून सलग सहा दिवस चंद्रपूरची नोंद हवामान खात्यात झाली आहे. सोमवारी सकाळी ते मंगळवारी सकाळपर्यंत देशातील सर्वाधिक कमाल तापमान (44.5) चंद्रपूर येथे नोंदले गेले आहे. वाढलेल्या उन्हामुळे महाराष्ट्र भाजून निघत आहे. विदर्भासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात बहुतांशी ठिकाणी तापमान गेले काही दिवस सातत्याने चाळिशी पारच आहे.

राज्यात येत्या शुक्रवारपर्यंत (ता. 27) मुख्यत: उष्ण व कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. विदर्भात उद्या (बुधवार) अणि गुरुवारी उष्णतेची लाट कायम राहणार असून, शनिवारी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्यास पोषक हवामान होत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

चटका आणखी दोन दिवस
राज्यात नोंदविलेल्या गेलेल्या 33 पैकी 22 जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडली आहे. अर्धा महाराष्ट्र उन्हाच्या चटक्‍यात होरपळत आहे. पुढील दोन दिवस उन्हाचा चटका कायम राहणार असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली.

चाळिशी गाठलेली राज्यातील शहरे (सर्व आकडे अंश सेल्सिअसमध्ये)
- पुणे - 39.7
- लोहगाव - 41.2
- नगर - 41.8
- जळगाव - 42.9
- मालेगाव - 42
- सांगली - 40.4
- सातारा - 40.1
- सोलापूर - 42.1
- परभणी - 44.1
- उस्मानाबाद - 41
- औरंगाबाद - 40
- नांदेड - 43
- बीड - 42
- अकोला - 43.3
- अमरावती - 41.6
- ब्रह्मपुरी - 43.7
- चंद्रपूर - 43.9
- गोंदिया - 41.1
- नागपूर - 41.8
- वर्धा - 43.2
- वाशीम - 41.8
- यवतमाळ - 42.5
(स्रोत - भारतीय हवामान खाते)

Web Title: summer heat temperature