राज्यात उन्हाचा चटका वाढणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

पुणे - वायव्य भारतातून येणाऱ्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांमुळे विदर्भासह मराठवाडा; तसेच मध्य महाराष्ट्र उन्हाच्या चटक्‍यांनी सोमवारी (ता.17) तापला. राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे 45.9 अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुण्यात 39.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील चोवीस तासांमध्ये राज्यातील काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

विदर्भात मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे तेथील तापमानाचा पारा वाढला आहे. येत्या मंगळवारी राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. तसेच शुक्रवारपर्यंत (ता. 21) राज्यात कोरडे हवामान राहणार असल्याचे पुणे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

गेल्या चोवीस तासांत हवामान होते. मराठवाड्याचा संपूर्ण भाग, कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राचा काही भाग, तर विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.

विदर्भातील तापमानात उच्चांकी तापमान
विदर्भातील बहुतांशी भागात उष्णतेची लाट असल्याने विदर्भातील सर्वच प्रमुख शहरांचा पारा 41 अंश सेल्सिअसच्या वर होता. अकोला येथे 44.8, अमरावती 44.2, गोंदिया 43.5, नागपूर 44, वर्धा 44.5, यवतमाळ येथे 43 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.

मराठवाड्यात तापमान वाढले
विदर्भापाठोपाठ मराठवाड्यातील तापमानही वाढले आहे. बीड येथे 43.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. औरंगाबाद येथे 41.6, उस्मानाबाद 42.9 अंश सेल्सिअस तापमान होते. मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहणार असल्याने कमाल तापमानात वाढ होण्याची शक्‍यता आहे.

मध्य महाराष्ट्र तापणार
विदर्भ, मराठवाड्यानंतर उष्णतेची लाट मध्य महाराष्ट्रात राहणार आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र उष्णतेने तापणार असल्याचे संकेत हवामान विभागाचे आहे. सध्या उत्तर महाराष्ट्रात जळगाव येथे 44.6 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे, तर मालेगावमध्ये 42.2, नाशिक 39.2, लोहगाव 41.9, सातारा 40.7, सांगलीमध्ये 39 अंश सेल्सिअस तापमान होते.

Web Title: summer increase in state