दूध दराबाबत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली: सुनिल तटकरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

शेतकऱ्यांच्या अब्रुची लक्तरे टांगण्याचे काम आणि कर्जमाफीच्या काळात शेतकऱ्यांच्या झोळीत प्रत्यक्षात पडलेले दान लक्षात घेता विसंगती दिसते.दुधाला दर मिळण्याबाबत दुध उत्पादकांनी सरकारशी सातत्याने चर्चा केली आणि करते आहे. दुधाच्या भुकटीला किलोला 50 रुपये आणि दुधाला 5 रुपये अनुदान दिले जाईल असे शासनाने जाहीर केले परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडलेले नाही.

नागपूर : दुध दराबाबत सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली असल्याने शेतकरी आज रस्त्यावर दुध ओतून आंदोलन करत आहे आणि दुग्धमंत्री गाठ माझ्याशी आहे अशी धमकी शेतकऱ्यांना देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या गंभीर विषयावर नियम 289 अन्वये चर्चा व्हावी अशी मागणी आमदार सुनिल तटकरे यांनी सभागृहात केली.

आज दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे राज्यात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तत्कालीन सरकारने दुध उत्पादक वाढीला पोषक असे धोरण राबवले होते मात्र आत्ताच्या सरकारने अक्षरश:शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत असा आरोपही आमदार सुनिल तटकरे यांनी केला.

शेतकऱ्यांच्या अब्रुची लक्तरे टांगण्याचे काम आणि कर्जमाफीच्या काळात शेतकऱ्यांच्या झोळीत प्रत्यक्षात पडलेले दान लक्षात घेता विसंगती दिसते. दुधाला दर मिळण्याबाबत दुध उत्पादकांनी सरकारशी सातत्याने चर्चा केली आणि करते आहे. दुधाच्या भुकटीला किलोला 50 रुपये आणि दुधाला 5 रुपये अनुदान दिले जाईल असे शासनाने जाहीर केले परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडलेले नाही. आज हजारो लिटर दुध शेतकरी रस्त्यावर ओतून टाकत आहेत. अधिवेशन काळात हे दुध उत्पादकांचे राज्यभर आंदोलन सुरु असून सभागृहात इतर विषय बाजुला ठेवून नियम 289 अन्वये चर्चा करावी अशी मागणी आमदार सुनिल तटकरे यांनी केली.

त्यावेळी सभागृहात सत्ताधारी पक्षातील शिवसेनेनेही मागणी केली त्यामुळे सभागृहात जोरदार गोंधळ निर्माण झाल्यामुळे सभापतींनी सभागृहाचे कामकाज 20 मिनिटासाठी तहकुब केले.

Web Title: Sunil Tatkare statement on Milk Agitation