दुष्काळ निवारणासाठी महाराष्ट्राला सहकार्य -  पंतप्रधान

दुष्काळ निवारणासाठी महाराष्ट्राला सहकार्य -  पंतप्रधान

शिर्डी - ""महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकार जी पावले उचलेल, त्याला केंद्र सरकार खांद्याला खांदा लावून संपूर्ण सहकार्य करील. पंतप्रधान पीकविमा योजनेद्वारे आणि शेतकऱ्यांनाही लवकरात लवकर मदत मिळेल,'' अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिली. 

साई समाधी शताब्दी वर्षाचा समारोप आणि पंतप्रधान आवास योजनेतून बांधलेल्या घरकुलांमध्ये ई-गृहप्रवेश समारंभ आज येथे झाला. त्या वेळी पंतप्रधान मोदी बोलत होते. ते म्हणाले, ""दसरा ते दिवाळी हा घर, गाडी व दागिने खरेदीचा काळ असतो. या काळात मी राज्यातील अडीच लाख गरिबांना घरांची मोठी भेट देऊ शकलो. त्यासोबत शौचालय, गॅस कनेक्‍शन व नळाचे पाणीदेखील देऊ शकलो, याचा आनंद आहे. गरिबीवर मात करण्याची ही पहिली पायरी आहे, असे मी समजतो. घरे मिळालेल्या गरिबांच्या चेहऱ्यावरील हास्य हीच माझी ऊर्जा आहे.'' साईबाबांच्या भूमीत येऊन मला ऊर्जा व उत्साह मिळाला. "सबका मालिक एक' हे साईबाबांचे सूत्र समाज एकत्र करण्याचे काम करते, असेही मोदी म्हणाले. 

त्यांच्या योजना"व्होट बॅंके'साठी 
कॉंग्रेसचे नाव न घेता टीका करताना पंतप्रधान म्हणाले, ""आम्ही गरिबांच्या कल्याणाचे एकमेव उद्दिष्ट ठेवून सरकारी योजना राबवतो; मात्र यापूर्वीचे सरकार गरिबांसाठीच्या योजना व्होट बॅंकेच्या राजकारणासाठी आणि एका परिवाराचे नाव देण्यासाठी राबवीत असे. पूर्वीच्या सरकारने चार वर्षांत गरिबांसाठी केवळ 25 लाख घरे बांधली. आम्ही चार वर्षांत सव्वा कोटी घरे बांधली. आमची नियत साफ आहे म्हणून हे करू शकलो.'' 

फडणवीस सरकारचे कौतुक 
"पंतप्रधान सिंचन योजनेच्या माध्यमातून अपुरे सिंचन प्रकल्प पूर्ण केले जात असल्याचे सांगून मोदी यांनी राज्यातील फडणवीस सरकारने गेल्या चार वर्षांत उत्तम काम केले,' अशा शब्दांत कौतुक केले. जलयुक्त शिवार, लोकसहभागातून तलावातील गाळ काढणे ही चांगली कामे राज्यात झाली. केंद्र सरकारने एकवीस पिकांना उत्पादन खर्चाच्या दीडपट नफा मिळेल, अशा हिशेबाने हमी भाव जाहीर केल्याचेही त्यांनी सांगितले. 

लाभार्थींशी संवाद 
राज्यातील सुमारे दोन लाख 44 हजार लाभार्थींचा घरकुलांमध्ये ई-गृहप्रवेश पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाला. त्यात त्यांनी नंदुरबार, सोलापूर, नागपूर, ठाणे, सातारा, लातूर या जिल्ह्यांतील लाभार्थींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. महिलांना बोलते करताना मोदी बहुतेकदा मराठीतूनच बोलत होते. ठाण्यातील लाभार्थी महिलांना त्यांनी गाणे म्हणण्याची गळ घातली. सातारा येथील लाभार्थींशी बोलताना तेथील प्रसिद्ध वकील लक्ष्मणराव इनामदार यांची आठवण काढून त्यांच्याकडून खूप काही शिकलो, अशी कृतज्ञता मोदी यांनी व्यक्त केली. 

सुरवात आणि शेवटही मराठीत 
मोदी यांनी भाषणाची सुरवात आणि शेवटही मराठीतूनच केला. "ओम साईनाथ! साईबाबांच्या या पवित्र भूमीवर उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. साईबाबांच्या महासमाधीच्या शताब्दी वर्षानिमित्त आपल्या दर्शनाचा योग आला, याचा मला अतिशय आनंद आहे,' अशी सुरवात मोदी यांनी केली. "श्रद्धा असू द्या, सबुरीही ठेवा. साईबाबांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना लाभो, ही साईचरणी प्रार्थना करून माझी बात समाप्त करतो, धन्यवाद,' असे म्हणत त्यांनी भाषण संपविले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com