सुधारणा करा तरच पाठिंबा - उद्धव ठाकरे

Uddhav-Thackeray
Uddhav-Thackeray

मुंबई - लोकसभेमध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने मतदान करणाऱ्या शिवसेनेने आज मात्र या विधेयकावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. या विधेयकाबाबत शिवसेनेने लोकसभेत जे प्रश्‍न उपस्थित केले, त्यावर समाधानकारक स्पष्टीकरण होत नाही तोपर्यंत या विधेयकाला शिवसेना पाठिंबा देणार नाही, असे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट करत, राज्यसभेत या विधेयकाच्या विरोधात मतदान करण्याचे संकेत दिले आहेत. 

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाबाबत अनेक मुद्द्यांवर स्पष्टतेची गरज आहे, देशाची चिंता फक्त आपल्यालाच आहे असे जर भाजपला वाटत असेल, तर तो भाजपचा भ्रम आहे, असा टोलाही उद्धव यांनी लगावला. या विधेयकाबद्दल नागरिकांच्या मनात काही भीती असेल तर त्यांची भीती दूर करण्याची आवश्‍यकता आहे, शेवटी ते या देशाचे नागरिक आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर सरकारने देणे गरजेचे आहे, असे उद्धव यांनी स्पष्ट केले. राज्यसभेत या विधेयकावर विस्तृतपणे चर्चा व्हावी, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्‍त केली.

लोकसभेमध्ये सत्ताधारी पक्षाकडून जे काही आणले जाते, त्याच्या बाजूने मतदान करणे म्हणजेच देशभक्ती आणि त्याला विरोध करणे म्हणजे देशद्रोह या भ्रमातून सर्वांनी बाहेर यायला हवे. या विधेयकाबाबत देशाला अनेक प्रश्‍न पडले आहेत, ते आम्ही सभागृहातसुद्धा मांडले. ज्या सुधारणा आम्ही लोकसभेत सुचविल्या आहेत, राज्यसभेत हे विधेयक येताना त्या सुधारणा केल्या गेल्या पाहिजेत व यामध्ये अधिक स्पष्टता आली पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com