कलम 370वर शहांनी दिलेली माहिती खोटी; सुप्रिया सुळेंचा दावा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 सप्टेंबर 2019

कलम 370 वरुन असत्य बोलून अमित शहा कृपया तुम्ही जनतेची दिशाभूल करु नका. या विधेयकावर मी मतदान केलेलेच नाही, असा समाचार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज घेतला. 

पुणे : कलम 370 वरुन असत्य बोलून अमित शहा कृपया तुम्ही जनतेची दिशाभूल करु नका. या विधेयकावर मी मतदान केलेलेच नाही, असा समाचार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज घेतला. 

भाजपच्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज सोलापुरात भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थित झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी 370 कलमावरून शहा यांनी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह सुप्रिया सुळे यांच्यावरही जोरदार टीकास्त्र सोडले. गेल्या 70 कोणालाही जमले नाही ते काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखविले आहे. या कलमाला खासदार सुळे यांनी विरोध करून मतदान केले, असा आरोप केला होता.

यावर सुळे यांनी आक्षेप घेतला असून त्या म्हणाल्या, की माझे लोकसभेतील रेकॉर्ड कोणीही तपासू शकते. या विधेयकावर मी मतदान केलेच नाही. तरीही शहा म्हणतात मी मतदान केले. ते खोटे बोलत आहेत. काश्मिरी जनतेचा आवाज दडपून, तेथील जनतेला अंधारात ठेवून असे निर्णय घेऊ नये, अशी आमची भूमिका होती. लोकशाही मानणाऱ्या देशांमध्ये लोकांच्या भावनेलाही स्थान द्यावे लागते. अतिशय घाईगर्दीने 370 कलम काढून टाकण्यासाठी हालचाली झाल्या होत्या. या साऱ्या प्रक्रियेला आमचा विरोध होता. तो संसदेतही आम्ही मांडला.

मात्र या विधेयकाच्या विरोधात मी मतदान केले नाही. मी, अखिलेश यादव यांनी सभात्याग केला. त्यामुळे अमित शहा यांनी चुकीची माहिती देऊन दिशाभूल करू नये, असे त्यांनी सुनावले.

Image may contain: text


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supriya sule attacks on amit shah on Article 370