
Supriya Sule : राज्याच्या राज्यपालपदी रमेश बैस; सुप्रिया सुळे म्हणाल्या, ईडी सरकारकडून बऱ्याच दिवसांनी…
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला आहे. यासोबतच रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. दरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी कोश्यारींच्या राजीनाम्याचे स्वागत केले. (Ramesh Bais New Governor)
भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा स्विकारल्यानंतर सुळे म्हणाल्या की, ज्या व्यक्तीने महाराष्ट्राचा, महापुरूषांचा अपमान केला, त्यांचा राजीनामा मंजूर झाला याचे मनापासून स्वागत करते.हे आधीच व्हायला हवं होतं. भाजप आणि इडी सरकारकडून बऱ्याच दिवसानंतर बरी कृती झाली. जनतेचा रोष आणि विरोधी पक्षाने मांडलेली भूमिका यामुळे त्यांना हे करावं लागलं असे सुळे म्हणाल्या.
कोश्यारी यांनी मान सन्मान दिला. त्यांनी संविधानाच्या चौकटीत राहून काम करणे अपेक्षित होतं. पण त्यांनी सातत्याने महाराष्ट्राचा अपमान करत राहिले त्यांना महाराष्ट्राची जनता त्यांना कधीच माफ करणार नाही असेही त्या म्हणाल्या. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी सुळे बोलत होत्या.
नवीन राज्यपालांकडून काय अपेक्षा आहेत?
नवीन राज्यपाल रमेश बैस यांचं स्वागत करत सुप्रीया सुळे म्हणाल्या की, अनेक वर्ष आम्ही संसदेत एकत्र काम केलं आहे. त्यांना जवळून काम करताना पाहिलं आहे. अतिशय सुसंस्कृत त्यांचं वागणं दोन टर्म मी पाहिलं आहे. माझी अपेक्षा आहे की संसदेत जसं चांगला खासदार म्हणून काम केलं तसंच त्यांनी जबाबदार गव्हर्नर म्हणून संविधानाच्या चौकटीत काम करावं अशी अपेक्षा असल्याचे सुप्रीया सुळे म्हणाल्या.
नवीन राज्यपालांकडून काय कामे व्हावीत असे तुम्हाला वाटते असा प्रश्न सुप्रीया सुळे यांना विचारण्यात आला त्यावर बोलताना त्या म्हणाल्या की, महाराष्ट्राला कमी दाखवणे तसेच अपमान करण्यासाठी एक अदृश्य हात काम करतेय, गुंतवणूक आली ती दुसऱ्या राज्यांमध्ये जाते. महाराष्ट्राचं देशामधील राजकीय आणि सामाजिक महत्व कमी करण्याचं षडयंत्र एक अदृश्य शक्ती करतेय हे सहा महिन्यात दिसतंय. या अदृश्य शक्तीची ताकद किती आहे यावरच ठरेल असेही सुप्रीया सुळे म्हणाल्या.
नव्या राज्यपालांचं केलं कौतुक…
रमेश बैस यांनी याआधी झारखंड आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. आता त्यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नेमणूक झाली आहे. यावेळी सुप्रीया सुळे यांनी नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांचे कौतुक करताना त्या म्हणाल्या की, मी त्यांना ओळखते. अतिशय सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणून फार जवळून त्यांना पाहिलं आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार अतिथी देवे भवं म्हणून त्यांचं स्वागतच आम्ही करू असेही सुळे म्हणाल्या.
गव्हर्नर साहेबांनी महाराष्ट्रात आल्यावर पहिल्यांदा विरोधी पक्षांना बोलवून घ्यावं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सुसंस्कृतपणा कसा येईल याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत असेही सुळे म्हणाल्या.