
Video : 'मी काय खाते-पिते याकडे इंदापूरमधले पुरुष लक्ष ठेवून', सुप्रिया सुळे करणार अमित शाहांकडे तक्रार|Supriya Sule
NCP Supriya Sule News: खासदार सुप्रिया सुळे ह्या दौंडच्या दौऱ्यावर आहेत. नॉनव्हेज खाऊन मंदिरात गेल्याचा आरोप त्यांच्यावर मागे करण्यात आलेला होता.
त्याला सुप्रिया सुळेंनी जशास तसं उत्तर दिलेलं असून आता थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सुरक्षेची मागणी करणार असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
दौंड तालुक्यातल्या नानविज येथे बोलतांना खासदार सुप्रिया सुळे यांनी जयंत पाटील यांच्यावर झालेल्या कारवाईवर भाष्य केलं. त्या म्हणाल्या की, माझं सकाळी जयंत पाटील यांच्याशी बोलणे झाले. चौकशी अमच्यासाठी नवीन नाही. शरद पवारांनादेखील अशी नोटीस पाठवली होती त्यांनतर महाराष्ट्रात काय झालं आपल्याला माहिती आहे.
हे दडपशाहीचं सरकार विरोधी पक्षातील लोकांना नोटीस पाठवतात. आधीची सरकारे होती त्यावेळी त्या स्वायत्त संस्था होत्या, आता अदृश्य हात या संस्था चालवतो.
जो विरोधात बोलतो त्याला ईडीची नोटीस पाठवतो. जयंत पाटील यांच्या लग्नाच्या वाढदिसानिमित्त हे गिफ्ट आले आहे. जयंत पाटील 2 पुस्तके घेऊन गेले आहेत तिथे वाचायला.
पुढे बोलतांना सुळे म्हणाल्या की, अनिल देशमुख यांच्या घरी १०९ वेळा धाड पडली आहे. नवाब मलिक जे काही बोलत होते ते आज खरं होत आहे. ते बोलत होते म्हणून त्यांना जेलमध्ये टाकले आहे. भाजपचे नेते म्हणतात की, आम्ही भाजपमध्ये गेल्यापासून आम्हाला झोप शांत लागते. (Latest Marathi News)
दरम्यान, नॉनव्हेज खाऊन मंदिरात गेल्याच्या आरोपांवर बोलतांना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी नॉनव्हेज खाल्ले नाही. कोणी आरोप केला आहे मला माहित नाही.
मी अमित शाह यांच्याकडे विनंती करणार आहे की, मी काय खाते आणि काय पिते याकडे इंदापूर आणि पुरंदरमधील अनेक पुरुष लक्ष ठेवून आहेत.
माझ्या सुरक्षेचा प्रश्न आहे. हा माझ्यावर अन्याय आहे, त्यामुळे मला सुरक्षा दिली पाहिजे. जे पुरुष माझ्या खाण्यापिण्यावर लक्ष ठेवून आहेत त्यांना अटक करावी. मी इंदापूरमध्ये काय खाल्ले हे त्यांना कसे माहिती? त्यादिवशी मी व्हेज खाल्ले आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.