सरोगेट आईला प्रथमच गर्भपाताची परवानगी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 डिसेंबर 2018

चोवीस आठवड्यांची गर्भवती असलेल्या सरोगेट आईला गर्भातील विविध दोषांमुळे वैद्यकीयदृष्ट्या गर्भपात करण्याची परवानगी उच्च न्यायालयाने प्रथमच दिली आहे.
 

मुंबई : चोवीस आठवड्यांची गर्भवती असलेल्या सरोगेट आईला गर्भातील विविध दोषांमुळे वैद्यकीयदृष्ट्या गर्भपात करण्याची परवानगी उच्च न्यायालयाने प्रथमच दिली आहे.

हृदयात व्यंग आढळून आल्याने असे मूल जन्माला घालण्याची इच्छा नाही, असे सांगत सरोगेट आईने उच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यावर न्यायालयाने हा निकाल दिला. पुण्यातील एका दांपत्यासोबत कायदेशीर करार करत त्यांचे मूल जन्माला घालण्याचा निर्णय या महिलेने घेतला होता. कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता झाल्यानंतर महिलेने गर्भ वाढवण्यास सुरवात केली होती; परंतु प्रसूतीपूर्व गर्भधारणा चाचणीत गर्भाच्या हृदयात व्यंग आढळून आल्याने त्यांनी संबंधित दांपत्याशी विचारविनिमय करून उच्च न्यायालयात गर्भपातासाठी परवानगी मागितली होती. नियमित न्यायालयाने बीजे मेडिकल कॉलेज आणि ससून रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या समितीकडून याबाबतचा अहवाल मागविला होता.

न्या. भारती डांगरे यांच्यासमोर हा अहवाल सादर करण्यात आला. तज्ज्ञ समितीने दिलेल्या अहवालानुसार संबंधित मूल जन्माला आल्यानंतर त्यावर बऱ्याच शस्त्रक्रिया कराव्या लागतील; तसेच त्यानंतरही हे मूल जिवंत राहण्याची शक्‍यता फार कमी आहे, असे अहवालात नमूद केले होते. त्यामुळे न्यायालयाने ससून रुग्णालयात गर्भपात करण्याची परवानगी दिली.

Web Title: Surrogate mother permits miscarriage for the first time