मागील पाच वर्षातील वृक्षतोडीचे सर्व्हेक्षण करा

उमेश वाघमारे
शनिवार, 22 जून 2019

मागील पाच वर्षात राज्यात महामार्गाच्या रुंदीकरणासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर झालेल्या वृक्षतोडीचे सर्व्हेक्षण करावे. तसेच ज्यांनी झाडे तोडली त्यांनी एकास तीन या प्रमाणे वृक्ष लागवड केली का ? ते वृक्ष जगविले का ? याचे ही सर्व्हेक्षण करावे.

जालना : मागील पाच वर्षात महामार्गाच्या रुंदीकरणासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली आहे. त्यामुळे या पाच वर्षातील वृक्षतोडीचे सर्व्हेक्षण करावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे,  असे राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी शनिवारी (ता.22) जालना येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.

याप्रसंगी जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना श्री. कदम म्हणाले, की एक झाड तोडल्यास तीन झाडे लावून ते जगवावीत असे न्यायालयाचे आदेश आहेत. मागील पाच वर्षात राज्यात महामार्गाच्या रुंदीकरणासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर झालेल्या वृक्षतोडीचे सर्व्हेक्षण करावे. तसेच ज्यांनी झाडे तोडली त्यांनी एकास तीन या प्रमाणे वृक्ष लागवड केली का ? ते वृक्ष जगविले का ? याचे ही सर्व्हेक्षण करावे. ज्यांनी वृक्ष तोड केली, मात्र एकास तीन या प्रमाणे वृक्ष लागवड करून ती जगविली नाही, अशांवर कारवाई करत गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे, असे राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले. 

तसेच वृक्ष लागवड करून उपयोग नाही, ती जगविणे गरजेचे आहे, असे नमूद करत श्री. कदम म्हणाले, की यंदा शासनाकडून 33 कोटी वृक्ष लागवड केली जाणार आहे. हे वृक्ष जगविण्याची जबाबदारी काही सामाजिक संस्था, कंपन्यांना देण्यात येणार असल्याचे वनमंत्री सुधीर ङ्कुनगुंटीवार यांनी सांगितल्याचे ही श्री. कदम यांनी म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: survey on tree cutting in Maharashtra