
Sushma Andhare : अंधारेंनी किरीट सोमय्यांना दिलं खोचक नाव; त्यांचा संपूर्ण रेकॉर्डच मांडला
मुंबई - शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधार यांनी विरोधी पक्षातील नेत्यांच्या सुरू असलेल्या चौकशांवरून भाजप नेते किरीट सोमय्या आणि भाजप नेतत्वावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी किरीट सोमय्या यांना अजब नाव दिलं.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, देशभरातील बिगर भाजप मुख्यमंत्र्यांनी आणि विविध पक्षांच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवलं. पंतप्रधानांना पत्र यासाठी लिहिलं की, देशाचे घटनात्मक प्रमुख म्हणून पंतप्रधानांकडे पाहिलं जातं. अपेक्षित असं आहे की, त्यांनीच याचं उत्तर द्यायला हवं. जर ते उत्तर देणार नसतील, तर त्यांच्या सचिवालयातील एखाद्या अधिकाऱ्यांनी पत्राला उत्तर द्यायला हवं. पण याउलट भाजपचे प्रवक्तेच उत्तर देत आहेत.
पत्र यासाठी लिहिलं होतं की, स्वयत्त यंत्रणांचा गैरवापर होतोय का? वारंवार भाजपविरहीत लोकांनाच नोटिस येत आहेत. जे दोन टक्के लोक आहेत, जे भाजपमध्ये असून त्यांच्यावर कारवाई झाली, ते भाजपसाठी निरुपयोगी झाले आहेत, असा दावा अंधारे यांनी केला. पण इतर पक्षातील नेते भाजपमध्ये गेले की, ते व्हाईट होतात. त्यांच्यावरच्या कारवाया थांबतात, असंही त्या म्हणाल्या.
दरम्यान 'स्वच्छता दूत' आणि ज्यांच्यामुळे भाजपचं सरकार सत्तेत आलं, असे किरीट सोमय्या ते राजकारणी कमी आणि माहिती अधिकार कार्यकर्तेच अधिक आहेत. त्यांनी आरोपी केलेल्या लोकांमध्ये प्रताप सरनाईक यांच्यावर आरोप केला होता. त्यांच्या र १७५ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप होता. सरनाईक यांनी शरणागती पत्करली. आपण असं समजू सोमय्या हे चुकून बोलले असेल. पण माणूस एकदा चुकू शकतो, पण नेहमीच नाही, असं अंधारे यांनी म्हटलं.
अंधारे पुढं म्हणाल्या की, सरनाईक यांच्यावर आरोप करण्यासाठी सोमय्या यांनी २२ पत्रकार परिषदा घेतल्या. आनंद अडसुळांसाठी त्यांनी ६ पत्रकार परिषदा घेतल्या. भावना गवळींसाठी त्यांनी ८ पत्रकार परिषदा घेतल्या आणि २२४ ट्विट केले. यशवंत जाधवांसाठी १६ पत्रकार परिषदा घेतल्या, अर्जुन खोतकरांसाठी त्यांनी ९ पत्रकार परिषदा घेतल्या. त्यांच्यासाठी २४ ट्विट केलं, असा रेकॉर्डच अंधारे यांनी समोर मांडला.