'सस्पेन्स थ्रिलर' नंतरचा 'महासत्ता' अंक 

संभाजी पाटील  @psambhajisakal 
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

एखाद्याने पळून जाऊन लग्न करावे, नव्या संसाराची स्वप्न पाहावीत, संसार नेटाने करू आणि टिकवू अशा आणा भाका घ्याव्यात आणि तीन दिवसांतच मुलगी लग्नाच्या वयाचीच नसल्याने उघड होऊन संसार मोडावा. अशीच काहीशी गत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी स्थापन केलेल्या सरकारची झाली.

पुणे : राज्यातील सत्तास्थापनेबाबत गेली महिनाभरापासून सुरू असलेल्या "सस्पेन्स थ्रिलर'चा आज शेवट झाला आणि राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सत्तेची सूत्र सांभाळणार हे स्पष्ट झाले. या संपूर्ण सत्तासंघर्षाचा केंद्रबिंदू, चर्चा-तर्कविर्तकांचे मूळ राहिले ते 'पवार'. गेमचेंजर शरद पवार आणि धक्कातंत्राचा वापर करणारे अजित पवार यांच्या भोवती फिरणारे राजकारण महाराष्ट्रातील जनतेने अनुभवल्याने त्याचे राजकीय परिणाम येत्या काहीकाळात पुण्यासह संपूर्ण राज्यात पहायला मिळणार हे नक्की! 

विधानसभेची निवडणूक होईपर्यंत राज्यात औषधालाही विरोधी पक्ष उरणार नाही, अशी चर्चा होती. लोकसभेचे लागलेले निकाल आणि दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांचा पक्षाला रामराम ठोकून भाजपात केला जाणारा प्रवेश यावरून भाजप-शिवसेना युती सत्तेवर येणार हे सूर्यप्रकाशा इतके स्पष्ट होते. निकालही तसाच लागला. राज्यातील जनतेने भाजप-शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत दिले. पण त्यानंतर शिवसेनेने घेतलेली भूमिका, दोघांचे तुटलेले संबंध, महाशिवआघाडीची चर्चा, राज्यपालांची भूमिका, राष्ट्रपती राजवट आणि तीन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येऊन राज्यात स्थापन केलेले 'धक्कादायक' सरकार हा सर्व प्रवास राज्यातील जनतेला चक्रावून सोडणारा ठरला. गेल्या तीन दिवसांतील न्यायालयीन लढाई, अजित पवार यांच्यावर टाकण्यात आलेला कौटुंबिक दबाव, जलसंपदा घोटाळ्यातील काही प्रकरणांच्या बंद करण्यात आलेल्या फाईल्स आणि आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल यामुळे पुन्हा एकदा फडणवीस यांना राजीनामा देणे भाग पडले. या सर्व नाट्यमय घडामोडीनंतर आता राज्यात 'महाविकासआघाडी'चे सरकार सत्तेवर येत असून, शरद पवार यांच्या हाती 'सूत्र' असणाऱ्या या सरकारमुळे राज्यात नवी सत्तासमीकरणे उदयाला येणार आहेत. 

गेल्या पाच वर्षांपासून सत्तेपासून दूर राहिलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला शिवसेनेमुळे सत्तालाभ झाला आहे. सत्ता गेल्यानंतर काय अवस्था होते, याचा अनुभव वर्षानुवर्षे सत्ता उपभोगणाऱ्या या दोन्ही पक्षातील नेत्यांनी घेतला आहे. त्यामुळे आता मिळालेली सत्ता हे तीनही पक्ष अत्यंत व्यवस्थितपणे सांभाळतील यात शंका नाही. कॉंग्रेस आघाडीला यापूर्वीचा एकत्रित सरकार चालविण्याचा अनुभव आहेच. त्यात आता शिवसेनेला सामावून घ्यायचे आहे. याही पेक्षा सत्तापदापासून आतापर्यंत दूर असणारे ठाकरे प्रथमच "मुख्यमंत्री' पदावर विराजमान होतील, त्यांची सरकार चालविण्याची पद्धत, प्रशासन चालविण्याचा वकूब यासर्व गोष्टी आता पहायला मिळणार आहेत. नव्या सरकारच्या बलस्थानांविषयीच बोलायचे झाले तर वेगवेगळ्या क्रिकेट टीममधील चांगले खेळाडू एकत्र आले, तर त्यांची जी टीम बनेल तशीच 'टीम' महाविकासआघाडीची बनू शकते. तीनही पक्षात मंत्रीपदाचा, मुख्यमंत्रिपदाचा आणि प्रशासन चालविण्याचा अनुभव असणारे नेते आहेत. त्यामुळे हे सरकार अधिक चांगले काम करेल, अशी अपेक्षाही बाळगण्यास हरकत नाही. या सरकारमध्ये फारसे मतभेद होतील आणि सरकार फारकाळ टिकणार नाही, असेही सध्या वाटत नाही. कारण एखादी गोष्ट मिळविण्यासाठी जेव्हा तीव्र संघर्ष करावा लागतो, त्यावेळी त्या गोष्टीचे महत्त्व कळते. तशीच भावना या तीनही पक्षात असेल.
 

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सर्व आमदारांसमोर बोलताना सांगितले होते की, ''आमची ही आघाडी आता पाचच्या पाढ्यात मोजा. म्हणजे ही पाच वर्षे, पुढची पाच वर्षे आणि त्यापुढची पाच वर्षे... याचा अर्थ स्पष्ट आहे, राज्यातून कोणत्याही परिस्थितीत भाजपला हद्दपार करणे हा शिवसेनेचा आणि काँग्रेस आघाडीचाही येत्या पाच वर्षातील अजेंडा असेल. त्यामुळे समृद्धी मार्ग, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, नवीन विमानतळांची निर्मिती, मेट्रो प्रकल्प, स्मार्ट सिटी असे कितीतरी भाजपचे प्रकल्प अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. 

राजकीय पटलावर विचार केल्यास पश्‍चिम महाराष्ट्रात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस आपले स्थान भक्कम करेल. अजित पवार आज ना उद्या पुन्हा राष्ट्रवादीत येतील किंवा आले नाहीत तरीही राष्ट्रवादी काँग्रेस सहकार, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या माध्यमातून आपला ढासळलेला पाया पुन्हा एकदा बांधतील. तळ्यात मळ्यात असणारे किंवा कारवाईच्या भीतीने भाजपमध्ये गेलेले किंवा विकास करण्यासाठी भाजपमध्ये गेलेले पुन्हा पक्षात येतील. त्यामुळे राज्यातील सत्ता गमावणे हा भाजपला सर्वात मोठा धक्का असेल, हे सांगण्याची वेगळी गरज नाही. 

जर राज्यात भाजपची सत्ता आली नाही, तर वेगळा विदर्भाचा विचार केंद्र सरकार करेल अशीही शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. शिवसेनेला डिवचण्यासाठी ही चर्चाही घडवून आणली जाईल. पश्‍चिम महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस भाजपने जे-जे प्रयोग राबवून आघाडीची तोडफोड केली हे प्रयोग भाजपला फोडण्यासाठीही होतील. शिवसेनेचा मुख्यमंत्री राहणार असल्याने आता शिवसेना स्वतः:च्या वाढीसाठी काय करणार हेही महत्त्वाचे राहणार. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे विशेषतः शरद पवारांचे राजकीय वारसदार कोण असतील याची चर्चाही आता थांबेल.

Image


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suspense Thriller issue of The superpower in Maharashtra Politics