Viral Video : तरुण सरपंचाने नोटा उधळल्या, मंत्री गिरीश महाजनांनी दखल घेत केली कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fulambri panchayat samiti

Viral Video : तरुण सरपंचाने नोटा उधळल्या, मंत्री गिरीश महाजनांनी दखल घेत केली कारवाई

छत्रपती संभाजी नगरः छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील फुलंब्री पंचायत समितीसमोर एका तरुण सरपंचाने दोन लाख रुपयांच्या नोटांचा पाऊस पाडला. याचा व्हीडिओ काल राज्यभर व्हायरल झाला. अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार, विहिरींना मंजुऱ्या न देणे यामुळे वैतागलेल्या मंगेश साबळे यांनी दोन लाख रुपयांच्या नोटा उधळल्या होत्या.

या प्रकरणाची दखल आता राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली आहे. ज्या बीडिओंवर त्यांनी आरोप केले त्यांना तातडीने निलंबित करण्यात आले. ज्योती कवडदेवी असं बीडीओंचं नाव आहे. शिवाय प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे आदेश मंत्री महाजन यांनी दिले आहेत.

हेही वाचाः महिलांनो तरुणपणी घेतलेली जमीन उतारवयात होईल आधार

उधळलेले पैसे परत करा- साबळे

सरपंच मंगेश साबळे यांनी बीडीओंवर केलेल्या कारवाईचं स्वागत केलं आहे. परंतु मी उधळलेले पैसे त्या महिला अधिकाऱ्याकडून वसूल करुन मला परत द्यावेत, अशी मागणी साबळेंनी केली आहे. उधळलेला पैसा हा गोरगरीब, कष्टकरी शेतकऱ्यांचा होता तो माघारी मिळावा, यासाठी आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करणार असल्याचं ते म्हणाले.

मंगेश साबळे हे फुलंब्री तालुक्यातल्या गेवराई पायगा गावचे सरपंच आहेत. पंचायत समितीमध्ये गावातील विहिरी मंजुरीसाठी पैसे मागितले जात असल्याने त्यांनी दोन लाख रुपये पंचायत समितीच्या आवारामध्ये उधळले होते.

सरपंच मंगेश साबळे हे व्हीडिओमध्ये सांगतात की, मी अपक्ष म्हणून निवडून आलो आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमी हे शेतकऱ्यांचं सरकार असल्याचं सांगत आहेत. परंतु फुलंब्री पंचायत समितीच्या बीडीओ मॅडम लाचेची मागणी करतात. गोरगरीब शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला कुणीही नाहीये, असा आरोप त्यांनी केलाय.

टॅग्स :girish mahajan