शेट्टी - सदाभाऊंमध्ये थेट 'स्वाभिमानी' लढाई

ब्रह्मदेव चट्टे
मंगळवार, 7 मार्च 2017

मी शेतकऱ्यांच्या हितासाठीच मंत्रीमंडळात आहे. त्यामुळे वेळोवेळी सरकार शेतकऱ्यांच्या हितीचे निर्णय घेत असते. आताही शेतमालाला भाव मिळावा म्हणून आम्ही प्रयत्नशिल आहोत. सरकार याोग्य तो निर्णय लवकरच घेईल.
- सदाभाऊ खोत (कृषी राज्यमंत्री)

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे हे सरकार दुर्लक्ष करत आहे असा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज (मंगळवार) मुंबईत विधानभवनाकडे जाणार रस्ता रोखून धरला. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी कांद्याला आणि तुरडाळीला हमीभाव मिळावा यासाठी विधान भवन प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर आंदोलन केले. स्वाभिमानीच्या या गनीमीकाव्याने विधानभवन परिसरात स्वाभिमानीचा "आवाज" घुमला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आणि शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदा आणि तूरडाळ फेकून सरकारचा निषेध केला. या आंदोलनामुळे काही काळ विधानभवन प्रवेशद्वाराजवळ वाहतुकीचा खोळंबा झाला. स्वाभिमानीचे नेते राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याही गाडीवर आंदलकांनी कांदे फेकले. यामुळे स्वाभिमानीच्या रडारवर आता आपलेच नेते असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानीचे नेते खासदार राजू शेट्टी व राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यामध्ये विसंवाद निर्माण झाल्याच्या चर्चेला आता पुष्टी मिळाली आहे.

एकीकडे कांद्याला आणि तुरडाळीला हमीभाव मिळावा यासाठी शेट्टी आंदोलन करत असताना दुसरीकडे केंद्रात आणि राज्यात ते भारतीय जनता पक्षाचे घटक पक्ष आहेत. याबाबत विचारले असता खासदार शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्वाभिमानी नेहमीच आग्रही राहणार असल्याचे सांगितले.  

सरकारमध्ये सहयोगी पक्ष असताना देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेला शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी तीव्र आंदोलन करावे लागत असल्याचे लक्षात आणून दिल्यावर शेट्टी यांनी वेळप्रसंगी सत्तेवर पाणी सोडू परंतू शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील कृषी राज्यमंत्री खोत यांनी सरकार कांद्याला आणि तुरडाळीला रास्त भाव मिळावा यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. त्याचेवळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या आंदोलनाचे देखील समर्थन खोत यांनी केले.

Web Title: Swabhimani Shetkari Sanghtana, Raju Shetty targets minister Sadabhau Khot