अखेर सदाभाऊंची शेतकरी संघटनेतून हकालपट्टी

Sadabhau Khot
Sadabhau Khot

पुणे: राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्याचा निर्णय चौकशी समितीने घेतला. संघटनेचे माजी अध्यक्ष दशरथ सावंत यांच्या नेतृत्तवाखालील समितीने त्याची घोषणा आज पुण्यात केली. सदाभाऊ यांची संघटनेप्रति निष्ठा राहिली नाही. सदाभाऊ यांना सत्ता सुंदरीचा स्पर्श झाल्याने मोह सोडविला जात नाही, अशी शब्दांत समितीने त्यांच्यावर ठपका ठेवला. 

सरकारमधून बाहेर पडायचे की नाही, याचा निर्णय मात्र संघटनेने लांबणीवर टाकला आहे. कार्यकारिणीची सभा घेऊन सरकारमधून बाहेर पडण्याबाबत ठरविण्यात येणार असल्याचे सावंत यांनी जाहीर केले. सदाभाऊ खोत हे संघटनेच्या कोट्यातून मंत्री झालेले होते. त्यामुळे स्वतंत्र कार्य़कारिणी घेऊन सदाभाऊंचा राजीनामा मागणार असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.

सदाभाऊंची हकालपट्टी होणार असल्याचे वृत्त "सरकारनामा'ने आधी दिले होते. ते खरे ठरले. सदाभाऊ हे पूर्णपणे भाजपच्या बाजूने गेले असून शेट्टी पुर्णपणे भाजपच्या विरोधात गेले आहेत. सदाभाऊ थेटपणे भाजपमध्ये कार्यरत होण्याच्या विचारात आहेत. सोबतीला नवी शेतकरी संघटना ते काढणार आहेत.

या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीने सदाभाऊंप्रकरणी निर्णय घेण्यासाठी चौकशी समिती स्थापन केली होती. या समितीने विचारलेल्या प्रश्‍नांना सदाभाऊंनी आपल्या धडाकेबाज पद्धतीने उत्तरे देत राजू शेट्टींना लक्ष्य केले होते. चौकशी समितीसमोर स्वत: उपस्थित राहत बाजू मांडली होती. त्यानंतर तीन आठवडे उलटल्यानंतर चौकशी समिती हकालपट्टीच्या निर्णयापर्यंत पोहोचली. त्यानुसार सोमवारी (ता. 7 ऑगस्ट) हकालपट्टीचा निर्णय जाहीर झाला. 

सदाभाऊंनी चौकशी समितीसमोर जाण्यापुर्वीच नवीन संघटना काढण्याचे सुतोवाच केले होते. ते पुढील रणनिती आखत असतानाच सांगलीतील एका महिलेने सदाभाऊंवर काही गंभीर आरोप केले. त्यासंबंधीची पत्रकार परिषद घेतली. तसेच पोलिस ठाणेही गाठले. हे प्रकरण त्यांनी कसेबसे मिटवले गेले. तोपर्यंत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महिलेच्या शोषणाचा मुद्दा विधीमंडळात उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सदाभाऊंची बाजू मांडावी लागली. याप्रकरणातील महिलेने तक्रार नसल्याचे लिहून दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र त्यानंतर लगेचच त्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला. आपण मॅनेज नसल्याचे, तसेच दबाव आणून पोलिसांनी तक्रार नसल्याबात लिहून घेतल्याचे त्या महिलेने म्हटले आहे. त्यामुळे त्या महिलेची टांगती तलवार सदाभाऊंवर कायम आहे. या प्रकरणी विरोधकांनी जोरदार टीका सदाभाऊ आणि संघटनेवर केली आहे. सदाभाऊंच्यामुळे संघटना बदनाम झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. आता या साऱ्या पार्श्‍वभूमीवर सदाभाऊ पुढील काय पावले उचलणार, याकडे आता लक्ष आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com