स्वच्छतेत महाराष्ट्र झारखंडच्या मागे

प्रशांत बारसिंग
शुक्रवार, 22 जून 2018

स्वच्छ राजधानी स्पर्धेतही मुंबई चौथ्या स्थानावर

स्वच्छ राजधानी स्पर्धेतही मुंबई चौथ्या स्थानावर
मुंबई - "स्वच्छ भारत अभियानां'तर्गत राबवलेल्या स्वच्छतेविषयीच्या विविध स्पर्धेत महाराष्ट्र देशपातळीवर दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. यामध्ये झारखंडने बाजी मारली असून, ते देशातील पहिले राज्य ठरले आहे. स्वच्छ राजधानीचे शहर या स्पर्धेतही मुंबईचा क्रमांक चौथा लागला आहे. राज्यातील निवड झालेल्या शहरांचा गौरव परवा (ता.23) इंदूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

स्वच्छ भारत अभियान हा देशपातळीवर राबवला जाणारा पंतप्रधान मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. 2015 पासून राबविल्या जाणाऱ्या या प्रकल्पात देशभरातील शहरे, राज्यांच्या राजधानीची शहरे यांचा समावेश आहे. दर वर्षी जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत स्वतंत्र अशा संस्थेमार्फत देशातील शहरांची विविध निकषांच्या आधारे तपासणी केली जाते. या तपासणीच्या आधारे गुण दिले जातात. या गुणांच्या आधारे मानांकन आणि क्रमांक काढले जातात. दर वर्षी ही तपासणी प्रक्रिया पार पाडली जाते. या वेळी सेवा क्षेत्रांत अग्रगण्य असलेली "कार्वे' या कंपनीने देशपातळीवरील शहरांचे मानांकन केले आहे.

घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व मलनिस्सारण व्यवस्था, नगर नियोजन, दळणवळण नियोजन, आदी घटक शहरांची तपासणी करताना गृहीत धरले जातात. या निकषांच्या आधारे निवड झालेल्या शहरांमध्ये राज्यातील नऊ शहरांचा समावेश आहे. राजधानीचे सर्वांत स्वच्छ शहर म्हणून देशात पहिला क्रमांक मुंबई उपनगरचा लागला आहे, तर नागपूर, नवी मुंबई, भिवंडी, भुसावळ, पाचगणी, सेंद्रारांजणगाव, सासवड या शहरांचा समावेश आहे. विशेषतः नवी मुंबई शहराला घनकचरा व्यवस्थापनात बक्षीस मिळाले आहे. देशभरातील 48 शहरांची विविध गटांत निवड केली आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते बक्षीस वितरण
मध्य प्रदेशातील इंदूर येथील नेहरू स्टेडिअमवर येत्या 23 जून रोजी देशभरातील निवड झालेल्या शहरांचा बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मुंबई उपनगर शहरासाठीचे बक्षीस दिले जाणार आहे.

Web Title: swatch bharat campaign maharashtra jharkhand