मुक्काम, जेवणही विहिरीवरच 

मुक्काम, जेवणही विहिरीवरच 

नेरळ  - कर्जत तालुक्‍यातील सर्वात मोठ्या आदिवासी वाडीतील महिला दररोज 35 ते 40 च्या गटाने पाण्यासाठी रात्री विहिरीवर मुक्काम करीत आहेत. तेथेच रात्रीचे जेवण बनवून पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी 24 तासाहून अधिक काळ ठाण मांडून बसण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. अशा कठीण परिस्थितीत प्रशासन टॅंकरही सुरू करीत नसल्याने ग्रामस्थांचे जगणे कठीण होऊन बसले आहे. 

पाथरज ग्रामपंचायतीमधील ताडवाडी ही 300 घरांची वस्ती असलेली वाडी आहे. माळरानावर वसलेल्या लाल मातीतील या वाडीत सध्या प्यायलाही पाणी नाही. वाडीतील लोकांसाठी बांधलेल्या तिन्ही विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे गावापासून दोन किलोमीटरवर असलेल्या निर्जन ठिकाणच्या एका विहिरीवर महिलांना पाणी आणण्यासाठी जावे लागते. त्या विहिरीनेही तळ गाठल्याने पाण्याचा एक हंडा मिळविण्यासाठी 24 तासांहून अधिक वेळ लागत आहे. मोठी लोकसंख्या असल्याने येथील महिलांना पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागत आहे. थेंब-थेंब पाणी विहिरीत गोळा होते. ते विहिरीतून आपल्या हंड्यात ओतून घेईपर्यंत महिलांना करावी लागणारी कसरत अत्यंत कष्टदायक, वेदनादायी आहे. कारण दररोज 35 ते 40 महिला आपला मुक्काम विहिरीवर करीत आहेत. त्यांनी पाण्यासाठी लावलेला नंबर 24 तासांनी येत असल्याने केवळ नंबर हुकू नये म्हणून या महिला रात्रीचे जेवणही तेथेच दगडांची चूल तयार करून शिजवतात. वाडीतील पुरुष मंडळी, तरुण असा साधारण 100 जणांचा मुक्काम दररोज रात्री विहिरीवर असतो! 

प्रशासनाला येथे टॅंकर सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीचा प्रस्ताव हवा आहे. ग्रामपंचायतीने तसा प्रस्ताव देण्यासाठी अजूनही पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ताडवाडी आणि मोरेवाडीसाठी जिल्हा नियोजन मंडळातून पाणी योजना मंजूर केली आहे; मात्र 28 लाखांच्या या पाणी योजनेचे काम आजपर्यंत जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने सुरू केलेले नाही. ताडवाडी - मार्गाची वाडी यांच्यामध्ये जंगलात असलेल्या जुन्या विहिरीची दुरुस्ती करून त्यातील पाणी उचलून जलवाहिनीद्वारे वाडीपर्यंत आणण्याची ही योजना आहे. विहिरीतून उचललेले पाणी दोन्ही वाडीत असलेल्या विहिरीत सोडण्याचे नियोजन आहे. ऑक्‍टोबर 2017 पासून मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेली ही नळपाणी योजना प्रत्यक्षात यायला काही महिने लागणार आहेत. त्यामुळे वाडीतील पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेऊन प्रशासनाने टॅंकर सुरू करावा, अशी मागणी महिलांनी केली आहे. 

आम्ही जुन्या विहिरीची दुरुस्ती करून नवीन पाणी योजना प्रस्तावित केली आहे. निविदा मंजूर झाली असून दीड महिन्यात काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्याच वेळी ज्या विहिरीवरून पाणी उचलून दोन किलोमीटरवरील वाडीत नेणार आहोत, ती विहीर मेअखेरपर्यंत पाणी पुरवू शकते का, हे पाहण्यासाठी जिल्हा भूजल सर्वेक्षण अधिकारी यांना पाचारण करण्यात आले आहे. त्यांच्या भेटीनंतर मुख्य कामाला सुरुवात होईल. 
- आर. डी. कांबळे, उपअभियंता, लघुपाटबंधारे विभाग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com