मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घ्या

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 26 मार्च 2017

शिवसेनेच्या आमदारांनी पक्षप्रमुखांकडे केली मागणी

शिवसेनेच्या आमदारांनी पक्षप्रमुखांकडे केली मागणी
मुंबई - गेल्या दोन वर्षांतील शिवसेनेच्या मंत्र्यांच्या कामगिरीवर शिवसेनेचे आमदार नाराज असून, तशी तक्रार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आमदारांनी केली असल्याचे समजते. त्यामुळे मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन मंत्रिपदाची भाकर फिरविण्याची मागणी शिवसेनेतील काही आमदारांनी केले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्यमंत्रिमंडळात शिवसेनेकडे पाच कॅबिनेट, तर सात राज्यमंत्रिपद आहेत. मात्र या मंत्रिपदाचा आमदारांना प्रत्येक्ष काही फायदा होत नसून शिवसेनेचे मंत्री आमदारांच्या कामांकडे दुर्लक्ष करत असल्याचे तक्रार शिवसेना आमदारांनी पक्षप्रमुखांकडे केली. विधिमंडळाच्या अधिवेशनात शिवसेनेच्या आमदारांना विश्‍वासात न घेताच अर्थसंकल्पाच्या लेखानुदान विना चर्चा मंजूर करण्यात आले. त्या वेळी आम्हाला बोलायचे, असा शिवसेनेच्या आमदारांनी हट्ट धरला होता. त्यानंतर कर्जमुक्तीवर औचित्याच्या चर्चेद्वारे शिवसेना आमदारांना शांत करण्यात आले. त्यामुळे मंत्री विश्‍वासात घेत नसल्याची भावना आमदारांनी पक्षप्रमुखांकडे व्यक्त केली. आमदारांच्या समस्या समजून घेण्यासाठी पक्षप्रमुखांनी एक दोन तासांची बैठक घेत आमदारांचे म्हणने ऐकून घेतले असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. या बैठकीत मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घ्यावा आणि मंत्रिपदाची भाकरी फिरविण्याची मागणी आमदरांनी केली आहे. भारतीय जनता पक्ष आपल्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये फेरबदल करणार असल्याचे सूतोवाच केले जात असताना, शिवसेनेच्याही मंत्र्यांच्या कामगिरीनुसार इतरांना संधी देण्याची आमदारांनी मागणी केली आहे. आमदारांच्या मागणीला पक्षप्रमुखांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये बदल होणार असल्याचा दावाही सूत्रांनी केला.

Web Title: Take stock of the performance of Ministers