विमा नसलेले वाहन रस्त्यावर उतरवल्यास होणार जप्तीची कारवाई

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 1 जानेवारी 2019

- मद्यपी वाहनचालकांचा 6 महिने परवाना निलंबित 
- परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा इशारा 
- विमा नसलेले वाहन रस्त्यावर उतरवल्यास होणार जप्तीची कारवाई 

मुंबई: मद्य पिऊन वाहन चालविल्यास संबंधित वाहनचालकाचा परवाना (लायसन्स) सहा महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय राज्य रस्ता सुरक्षा परिषदेच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच, विमा नसलेले किंवा विम्याची मुदत संपलेले वाहन रस्त्यावर उतरवल्यास अशा वाहनावर तात्पुरत्या जप्तीची कारवाई करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आल्याची माहिती राज्याचे परिवहनमंत्री व रस्ता सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली. वाढते अपघात रोखण्याच्या दृष्टीने आजच्या बैठकीत व्यापक चर्चा होऊन विविध निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या या बैठकीस गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, परिवहन आयुक्त शेखर चन्ने, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल, सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. अनुप यादव, सचिव (रस्ते) सी. पी. जोशी, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) विनय कोरगावकर, सहपोलीस आयुक्त (वाहतूक) अमितेशकुमार यांच्यासह संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

अनेक अपघात हे वाहनचालकांनी दारूच्या नशेत वाहने चालविल्याने होत असल्याचे विविध अहवालांतून निष्पन्न झाले आहे. हे रोखण्यासाठी आरटीओ आणि वाहतूक पोलिसांमार्फत सध्या मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. मागील दोन महिन्यांत राज्यात 12 हजार वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यातील बहुतांश कारवाया या मद्य पिऊन वाहन चालविल्याप्रकरणी आहेत. मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांना जरब बसविण्यासाठी त्यांचा परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे रावते यांनी सांगितले.

Web Title: The take strict action of non-insurance vehicles