मानसिक संतलुन आता ढासळतयं!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

प्रति, 
मा. पंकजाताई, 

आज मी जे काही तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करते आहे. ती केवळ माझी एकटीची व्यथा नसून, पुणे जिल्ह्यातील सुमारे 400 शिक्षक भगिनींची आहे. 

प्रति, 
मा. पंकजाताई, 

आज मी जे काही तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करते आहे. ती केवळ माझी एकटीची व्यथा नसून, पुणे जिल्ह्यातील सुमारे 400 शिक्षक भगिनींची आहे. 

ताई, सुमारे 10-11 वर्षांपूर्वी आम्ही स्वतःला सावित्रीच्या लेकी समजून, शिक्षकी पेशा स्वीकारला. शिक्षण प्रक्रियेत स्वतःला स्वतःला झोकून दिले. मात्र 28 मे 2018 रोजी आमच्या पायाखालची जमीनच सरकली. आम्हाला व्हॉटस्‌ऍपवर मेसेज आला की, जिल्हांतर्गत ऑनलाइन बदली प्रक्रियेत आपण विस्थापित झालो आहोत. तरीही आम्ही खोटी आशा बाळगून होतो. पण तीही फोल ठरली. कारण आम्हाला जाणीव झाली की, आम्हा महिला शिक्षकांवर या बदली प्रक्रियेत मोठा अन्याय झाला आहे. मुळातच यावर्षीची बदलीप्रक्रिया ज्या टप्प्याने, क्रमाने व्हायला हवी, तशी झालीच नाही. आम्हाला पसंतीक्रमाच्या शाळा देताना, हव्या त्या याद्या प्रसिद्ध केल्या गेल्या नाहीत. परिणामी आम्हा सर्व जणींना विस्थापित व्हावे लागले. दुसऱ्या टप्प्यात नाइलाजाने रॅंडम राऊंडला जाण्याच्या भीतीने उरलेल्या दुर्गम व पेसांतर्गत येत असलेल्या शाळांचे पसंतीक्रम भरले आणि शेवटी आम्हाला दुर्गम व पेसांतर्गत येत असलेल्या शाळेत नियुक्‍त्या देण्यात आल्या. 

ताई, तुम्ही आश्‍वासन दिले होते की, महिलांना दुर्गम भागातील शाळांवर नियुक्ती दिली जाणार नाही. त्याबाबतचा आदेशही आपण काढला. पण आपल्याच प्रशासनाने प्रत्यक्ष बदल्यांमध्ये मात्र या नियमाविरोधात जाऊन, या बदल्यांमध्ये आमच्यावर घोर अन्याय केला आहे. या अन्यायाविरुद्ध आम्ही, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते, उपाध्यक्ष व शिक्षण समितीचे सभापती विवेक वळसे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे आणि जिल्हा शिक्षणाधिकारी (प्रभारी) हारूण आतार आदींकडे हजारो विनंत्या केल्या. परंतु या सर्वांनी कानावर हात ठेवले. आता काहीच बदल होणार नाही. एक वर्ष तुम्ही दुर्गम ठिकाणी काम करा. पुढच्या वर्षी बघू, अशी उत्तरे त्यांच्याकडून मिळाली. तरीही मनाची कशीबशी तयारी करून, आम्ही त्याही अतिदुर्गम शाळेत पोचलो. शाळेत नव्यानेच दाखल झालेल्या मुलांबरोबर आम्हीही रडत होतो. कारण होते शाळेचे दुर्गम ठिकाण. 

ताई, आमच्या शाळांचे अंतर घरापासून एका बाजूने किमान 60किलोमीटर तर, कोणाचे 100 किलोमीटरपर्यंत आहे. तेथे जाण्यासाठी दळणवळणाचे कोणतेही साधन नाही. शाळेत पोचणे महादिव्यच. दीड ते दोन तासांच्या एसटीच्या प्रवासानंतर तीन ते आठ किलोमीटरपर्यंतचा पायी प्रवास. सगळा रस्ता डोंगरी भागातून जाणारा. घनदाट झाडी, रस्त्यात दिसणारे आणि याआधी कधीही न पाहिलेले वेगवेगळे प्राणी. मध्येच दर्शन देणारे साप, विंचू आणि त्यांच्या सोबतीला पडणारा पाऊस. या सर्व संकटांशी सामना करत-करत कसेबसे शाळेत पोचायचे. या प्रवासातच आमची सर्व स्फूर्ती संपून जाते. शाळेत पोचल्यानंतर परत कधी आणि कसे पोचणार, याचीच मनोमन चिंता. काही अडचण आली तर, मोबाईल नेटवर्कही नाही. आदिवासी वाड्या-वस्त्यांवरच्या शाळा. त्यामुळे मुक्काम कोठे आणि कसा करायचा? इकडे घरी आमची लहान मुले वाट पाहत असतात. त्यांचे चेहरे समोर येतात? 

तुम्हीच सांगा ताई, अशा परिस्थितीत आम्ही काम करायचे कसे? शाळेत पोचायचे कसे? घरी परत यायचे कसे? पावसाळ्यात दुथडी वाहणाऱ्या नद्या, ओढे आणि नाले आम्हाला परत घरी येऊ देतील का? एवढ्या दुर्गम भागात महिलांनी पायी किंवा दुचाकीवर प्रवास करायचा कसा? वाटेत काही अघटित घटना घडल्या तर, जबाबदार धरायचे कोणाला? 

ताई, तुम्ही तर सांगितले होते, अशा शाळांवर महिलांना नियुक्ती दिली जाणार नाही. मग तुमच्या त्या घोषणेचे मग नक्की काय झाले? आशा आहे ताई, एक स्त्री म्हणून तुम्ही या पत्राचा नक्की विचार कराल. सध्या माझ्यासारख्या शेकडो शिक्षिकांचे शारीरिक, मानसिक संतुलन ढासळू लागलंय. काही तरी अघटित घडण्याअगोदर तुम्ही नक्कीच आमच्या संरक्षणाची जबाबदारी घ्याल, अशी खात्री आहे. आणि हो, या माझ्या पत्रात काही अवास्तव वाटले तर, नक्कीच पेसांतर्गत व अतिदुर्गम भागातील शाळांना भेटी द्यायला यावे, ही नम्र विनंती. धन्यवाद. 

कळावे, 
आपलीच एक अन्यायग्रस्त शिक्षिका 

Web Title: Teacher letter to Pankaja Munde