शिक्षक पदोन्नती तात्पुरती स्थगित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

पुणे - राज्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या पदोन्नतीला शालेय शिक्षण विभागाने तात्पुरती स्थगिती दिली असून, त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. या स्थगितीमुळे सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्याऐवजी अनुभव कमी असणाऱ्या शिक्षकांच्या पदोन्नतीला आळा बसणार आहे. 

पुणे - राज्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या पदोन्नतीला शालेय शिक्षण विभागाने तात्पुरती स्थगिती दिली असून, त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. या स्थगितीमुळे सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्याऐवजी अनुभव कमी असणाऱ्या शिक्षकांच्या पदोन्नतीला आळा बसणार आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

राज्यातील खासगी माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठता आणि पदोन्नतीबाबत शिक्षण विभागाने परिपत्रकाद्वारे हे आदेश दिले आहेत. शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठतेबाबत राज्य खासगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावलीतील निकषानुसार तपासणी करण्याचे सरकार स्तरावर विचाराधीन आहे. दरम्यान, फारसा अनुभव नसतानाही पदोन्नती मिळत असल्याची नाराजी विविध संघटनांकडून व्यक्त होत होती. शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती मिळावी, अशीही मागणी वारंवार करण्यात येत होती. यानुसार शिक्षण विभागाने पदोन्नतीला स्थगिती दिली आहे. त्यानुसार माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या पदोन्नतीची कार्यवाही तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात यावी, असा आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे विभागाचे अवर सचिव सं. द. माने यांनी परिपत्रकाद्वारे दिला आहे.

तसेच दरम्यानच्या काळात मुख्याध्यापकपदाची जागा रिक्त असल्यास माध्यमिक शाळेमधील आर्थिक आणि दैनंदिन कार्यालयीन कामकाज पार पाडावे, यासाठी संबंधित शाळेतील सेवाज्येष्ठ असलेल्या शिक्षकास प्रभारी मुख्याध्यापक म्हणून मुख्याध्यापक पदाचा कार्यभार नियमानुसार सोपविण्यात यावा, अशी सूचनाही शिक्षण विभागातर्फे करण्यात आली आहे.

राज्यात जवळपास दोन हजार शिक्षक सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत; परंतु कमी अनुभव आणि केवळ डी.एड. झालेल्या शिक्षकांना पदोन्नती मिळण्याचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. याबाबत सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. शिक्षण विभागाने दिलेल्या स्थगितीमुळे आगामी काळात सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शिक्षकांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे.
- संजय यादव, अध्यक्ष,  बी. एड. नियुक्त माध्यमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य

Web Title: Teacher promotion temporarily adjourned