खासगी संस्थांत 'पवित्र पोर्टल'द्वारे #शिक्षकभरती: विनोद तावडे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 जून 2018

शाळांमध्येच वीस गुण मिळत असल्यामुळे विद्यार्थांचे मोठे नुकसान होत आहे. जे विद्यार्थी याच गुणावर पास होतात, त्यांची आपणच फसवणूक करतो, असे करून चालणार नाही. 
- विनोद तावडे, शिक्षणमंत्री 

कोल्हापूर : दहावीसाठी शाळास्तरावर प्रात्यक्षिकाचे दिले जाणारे वीस गुण पुढील वर्षीपासून बंद केले जाणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज येथे केली. यापुढे खासगी शिक्षण संस्थांच्या शाळांमध्येही शिक्षक भरती शासनाच्या "पवित्र पोर्टल' प्रणालीद्वारे केली जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे जन्मशताब्दी महोत्सव प्रारंभावेळी ते बोलत होते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील अध्यक्षस्थानी होते. 

तावडे म्हणाले, "राज्यातील 98 टक्के शाळांनी 20 पैकी 18 मार्क दिले आहेत, हे कसे शक्‍य आहे? विद्यार्थांना दहावीमध्ये पास करण्यासाठी खटाटोप करतो आणि त्याला पुढे अडकवून ठेवतो. त्यामुळे दहावीच्या पाया पक्का झाला पाहिजे. यासाठी शाळा स्तरावर असणारे वीस गुण पुढील वर्षीपासून बंद केले जातील. खासगी संस्थांमध्ये पोर्टल प्रणालीद्वारेच शिक्षक भरती केली जाईल. त्यामुळे कोणालाही आपल्या आईचे दागिने आणि वडिलांची जमीन विक्री करावी लागणार नाही. अनेक संस्था दहा-दहा लाख रुपये घेऊन शिक्षक भरती करतात. त्यांना चाप बसणार असून, भविष्यात शिक्षक भरतीसाठी एक तांबडा पैसाही द्यावा लागणार नाही.'' 

ते पुढे म्हणाले, "राज्यातील वरिष्ठ महाविद्यालय प्राचार्य भरतीची बंदी उठवली असून, आता प्राध्यापकांच्या भरतीची बंदीही लवकरच उठवली जाईल. फर्ग्युसन महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा दिला असून विवेकानंद, रयत, शिवाजी अशा शिक्षण संस्थांनीही भविष्यात अशा पद्धतीने काम करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळांनी 20 गुण देण्याची पद्धती पुढील वर्षापासून बंद केली जाईल.'' 

शाळांमध्येच वीस गुण मिळत असल्यामुळे विद्यार्थांचे मोठे नुकसान होत आहे. जे विद्यार्थी याच गुणावर पास होतात, त्यांची आपणच फसवणूक करतो, असे करून चालणार नाही. 
- विनोद तावडे, शिक्षणमंत्री 

Web Title: teacher recruitment in private organisation on Pavitra portal says Vinod Tawde