Old Pension : दहावी-बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा; शिक्षक संघटना म्हणतात... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Old Pension

Old Pension : दहावी-बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा; शिक्षक संघटना म्हणतात...

मुंबईः यंदाच्या दहावी-बारावी परीक्षेचे पेपर तपासण्यावर बहिष्कार टाकण्याचा इशारा राज्यातील शिक्षक संघटनांनी दिला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे.

आज सांगलीमध्ये जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये तब्बल २२५ कर्मचारी संघटना सहभागी झाल्या होत्या. राज्य शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली.

हेही वाचाः नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

दरम्यान, केंद्र सरकारने २००३ पूर्वीच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील शिक्षकदेखील या मागणीवर ठाम आहेत. उद्या यासंदर्भात शिष्टमंडळाची बैठक होऊन निर्णय घेतला जाणार आहे. 'एबीपी माझा'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

येत्या १४ मार्चपासून शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. शिवाय दहावी आणि बारावीचे पेपर तपासणार नसल्याची भूमिका शिक्षक संघटनांनी घेतली आहे. यासंदर्भात उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलावली असून त्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे.

सांगलीच्या मोर्चामध्ये बोलतांना रोहित पाटील म्हणाले की, मोर्चाच्या निमित्ताने का होईना महाराष्ट्र नव्याने नवे दिवस बघेल. कारण जुनी पेन्शन योजना हा हक्क आहे. एका वरिष्ठ नेत्याने राज्य दिवाळखोरीत निघेल, असं विधान केलं होतं. परंतु हिमाचल प्रदेशमधल्या लोकांनी माजी मुख्यमंत्र्यांना याच मुद्द्यावरुन घरी बसवलं आहे. त्यामुळे या सरकारला निर्णय घ्यावा लागेल, असं पाटील म्हणाले.