'टीम सीएमओ'ने मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा केला 'जरा हटके'

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 22 जुलै 2019

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्याची कल्पना मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य सचिव भूषण गगराणी यांनी आखली होती. त्यानुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबई : महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आज (सोमवार) जरा हटक्या पद्धतीने साजरा करण्यात आला. फडणवीस हे वाढदिवस साजरा करत नाहीत, पण आज मात्र 'वर्षा'वर त्यांनी वृक्षारोपण करून आपला वाढदिवस साजरा केला.

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्याची कल्पना मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य सचिव भूषण गगराणी यांनी आखली होती. त्यानुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. म्हाडाचे उपाध्यक्ष आणि सनदी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे वृक्षारोपणासाठी आग्रह धरला. व्यक्‍तिगत समारंभाला फाटा देण्यावर फडणवीस ठाम होते, पण वृक्षारोपण मात्र पर्यावरणपूरक असल्याने त्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. 

वाढदिवसाला हारतुरे नकोत, ही रक्‍कम मुख्यमंत्री निधीला द्या, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री निधीत जमा केले. सुमारे 20 अधिकारी कर्मचारी मुख्यमंत्री कार्यालयात काम करतात. त्यांनी निधीला दिलेले योगदान फडणवीस यांना सुखावून जाणारे होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Team CMO celebrate birthday of CM Devendra Fadnavis