सांगा, मग देशाला सुवर्णपदक कसे मिळेल?

सांगा, मग देशाला सुवर्णपदक कसे मिळेल?

शिक्षक : गण्या, आपल्या देशाला ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक का मिळाले नाही?
गण्या : सर, तुम्ही पिटीच्या तासाला आम्हाला शाळेच्या मैदानावरचे गवत उपटायला लावाल, कागदाचे कपटे गोळा करायला लावाल, तोवर खेळात आपल्या देशाला सुवर्णपदक कसे काय मिळेल?
 

आज दिवसभर सोशल मीडियावर हा विनोद फिरत आहे. विनोद म्हणून क्षणभर हसायला ठीक आहे; पण खेळाच्या बाबतीत शालेय पातळीवर आपण किती उदासीन आहोत, खेळाला आपल्या दृष्टीने किती गौण स्थान आहे, यावर हा विनोद गंभीर भाष्य करणारा आहे. कारण शालेय पातळीपासूनच मुले खेळात प्रवीण झाली पाहिजेत, असे आपण म्हणतो; पण 2012 पासून कोणत्याही शाळेत नवा क्रीडा शिक्षक भरलेला नाही. जे नेमले आहेत, त्यांना महिन्याला फक्त अडीच हजार रुपये मानधन आहे. अशा अवस्थेत शाळा-शाळांतच खेळाडू तयार झाले पाहिजेत, सुवर्णपदक खेचून आणले पाहिजे, अशी आपली अपेक्षा आहे.
ऑलिंपिकमध्ये तूर्त तरी फक्त दोन पदकांवर आपण समाधानी आहोत. 125 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात चांगले खेळाडू का घडू शकत नाहीत, असा सहज मनात येणारा प्रश्‍न; पण त्याचे धडधडीत उत्तर अगदी शालेय प्राथमिक पातळीवरच उघड आहे. जे सर्व घटकांना माहीतही आहे; पण तरीही उच्च पातळीच्या कामगिरीची अपेक्षा सहजपणे व्यक्त केली जात आहे.
 

शालेय पातळीवरच विद्यार्थ्यांत खेळाबद्दल, शारीरिक शिक्षणाबद्दल जागरूकता व्हावी. चांगले खेळाडू घडण्याची सुरवात शालेय स्तरावरच सुरू होण्यासाठी क्रीडा विभाग आहे. प्रत्येक वर्गाला त्यासाठी पिटीचा तास आहे. या तासात विद्यार्थी अन्य विषयांच्या जंजाळातून काही वेळ बाहेर या. त्याचे क्रीडा कौशल्य बहरत जावे, या हेतूने अभ्यासक्रमही आहे; पण हा पिटीचा तास म्हणजे तासभर मुलांना मोकळे सोडणे, त्यांच्याकडून शाळा स्वच्छतेची कामे करून घेणे, असा प्रकार बहुतेक शाळांत सुरू आहे. कारण 2012 पासून पूर्ण वेतनावर क्रीडा शिक्षकांची नेमणूकच बंद झाली आहे. तासाला पन्नास रुपये व महिन्याला एकूण 2500 रुपयांपेक्षा जास्त मानधन नाही, अशा तत्त्वावर शिक्षक नेमले गेले आहेत. अशा अवस्थेत हे नामधारी शिक्षक काय ताकदीचे विद्यार्थी घडवणार?
 

शाळा तिथे मैदान असलेच पाहिजे, असा शाळा मंजूर करताना नियम आहे; पण जुन्या शाळा, महापालिका, जिल्हा परिषद शाळा वगळता काही खासगी शाळांना मैदानच नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे तेथे खेळाडू घडतील, ही अपेक्षाच करणे चुकीचे ठरले आहे.
 

आर.टी. ऍक्‍टनुसार क्रीडा, कला व कार्यानुभव या तीन विषयांसाठी मानधनावरच शिक्षक नेमण्याचा नियम लागू झाला आहे. वास्तविक कला व क्रीडा हे जीवनाचे अविभाज्य अंग. याच अंगाने पूर्वी क्रीडा व कला शिक्षकांना सन्मान होत होता; पण आता कला, क्रीडाला शिक्षक नाही आणि अपेक्षा मात्र मोठ्या आहेत; पण प्राथमिक शालेय पातळीवरच क्रीडा विभागाला शिक्षकच नसेल आणि असलाच तर तो 2500 रुपये मानधनावरचा नसेल, तर पदक कसे मिळणार, याचे उत्तर कोणाकडे आहे?
 

शाळेत पूर्ण पगारी क्रीडा शिक्षक नाही. अनेक शाळांमध्ये मैदान नाही. अशा स्थितीत क्रीडा शिक्षक खेळाडूंची नवी पिढी कशी घडवतील. अशाही परिस्थितीत क्रीडा शिक्षक पदरमोड करून खेळ टिकवण्यासाठी जरुर धडपड करत आहेत; पण हा कायमस्वरूपी मार्ग नाही. त्यासाठी शासनानेच खेळाला प्राधान्य द्यायला हवे आणि क्रीडा, कला शिक्षकांनाही मानाचे स्थान मिळाले पाहिजे. नाहीतर ""बिनपगारी, फुल अधिकारी‘‘ शिक्षकांकडून मोठ्या अपेक्षा करण्यात काय अर्थ आहे. 

- आर. डी. पाटील, अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा क्रीड शिक्षक संघटना.


या शिक्षकांची निघतात नावे
कुंडले, दळवी, साळोखे, हिरेमठ, कांडवले, आर. डी. पाटील, आर. व्ही. केसरकर, भरत लाटकर, मुछवाले पाटील, एम. व्ही. शिंदे, एस. पी. माने, मंदा कदम, एस. व्ही. सूर्यवंशी, जे. एस. पाटील, एन. डी. गायकवाड, जगदाळे या जुन्या काळातील पि. टी. शिक्षकांची नावे आजही जुन्या पिढीतील विद्यार्थ्यांच्या लक्षात आहेत. विविध शाळांतील या पिटी शिक्षकांनी खेळाची गोडी वाढवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com