टेमघर धरण दुरुस्तीबाबत मागितल्या नव्याने निविदा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

पुणे - टेमघर धरणाच्या दुरुस्तीसाठी मागविण्यात आलेल्या निविदेला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने जलसंपदा विभागाने दुसऱ्यांदा निविदा मागविल्या आहेत. दरम्यान, धरणाच्या दुरुस्तीची पूर्वतयारी म्हणून धरणाचा पाणीसाठा निम्म्यावर आणला आहे. 

पुणे - टेमघर धरणाच्या दुरुस्तीसाठी मागविण्यात आलेल्या निविदेला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने जलसंपदा विभागाने दुसऱ्यांदा निविदा मागविल्या आहेत. दरम्यान, धरणाच्या दुरुस्तीची पूर्वतयारी म्हणून धरणाचा पाणीसाठा निम्म्यावर आणला आहे. 

टेमघर धरणातून मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याची बाब निदर्शनास आली. त्यानंतर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ऑगस्ट महिन्यात तातडीने भेट देऊन त्याची पाहणी केली. धरणाची दुरुस्ती आणि या गळतीला दोषी असलेल्यांवर गुन्हे दाखल करण्याची घोषणाही त्यांनी केली होती. त्यानुसार याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. धरणाच्या दुरुस्तीसाठी 98 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली, दुरुस्तीच्या निविदाही काढण्यात आल्या; परंतु त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नव्याने निविदा मागविण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. 

ही निविदा ऑनलाइन पद्धतीने 25 नोव्हेंबरपर्यंत भरता येणार आहे. पुढील महिन्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामास सुरवात होईल, अशी अपेक्षाही अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या धरणाची साठवण क्षमता 3.71 टीएमसी आहे. याच्या दुरुस्तीकरिता पुणे शहराला पिण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी आधी याच धरणातून वापरण्यात आले. सध्या धरणात निम्मा पाणीसाठा आहे. पुढील काही दिवसांत तो आणखी कमी होऊन प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम सुरू होईल. प्रथम भिंतीची दुरुस्ती करण्यात येणार असून, दोन वर्षांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Web Title: Temaghar dam newly repaired dam tender