उस्मानाबाद १२.४ अंशावर, तापमानात २ ते ५ अंशांची घट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 ऑक्टोबर 2016

पुणे (प्रतिनिधी) : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात गारठा वाढू लागला आहे. रात्रीचे किमान तापमान वेगाने होत असल्याने तापमानात सरासरीपेक्षा २ ते ५ अंशांची घट होत आहे. शुक्रवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये उस्मानाबाद येथे रात्रीच्या नीचांकी १२.४ तापमानाची नोंद झाली. बंगालच्या उपसागरात असलेल्या कमी दाब क्षेत्रामुळे सोमवार (ता. ३१), मंगळवार (ता. १) रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले. 

पुणे (प्रतिनिधी) : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात गारठा वाढू लागला आहे. रात्रीचे किमान तापमान वेगाने होत असल्याने तापमानात सरासरीपेक्षा २ ते ५ अंशांची घट होत आहे. शुक्रवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये उस्मानाबाद येथे रात्रीच्या नीचांकी १२.४ तापमानाची नोंद झाली. बंगालच्या उपसागरात असलेल्या कमी दाब क्षेत्रामुळे सोमवार (ता. ३१), मंगळवार (ता. १) रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले. 

कमी दाब क्षेत्रामुळे उत्तरेकडील थंड वारे दक्षिण दिशेकडे ओढले जात असल्याने राज्यात थंडी वाढू लागली आहे. राज्यात अनेक ठिकाणी रात्रीचे तापमान १५ अंशांच्या खाली उतरले आहे. राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानात सरासरीपेक्षा ३ अंशांची घट झाल्याने पहाटे गारठा वाढला आहे. सोलापूर आणि यवतमाळ येथे रात्रीच्या तापमानात सरासरीपेक्षा ५ अंशांची घट झाली होती. 

बंगालच्या उपसागरात अालेले ‘क्वांट’ चक्रीवादळ निवळल्यानंतर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ३.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत होते, तर पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीपर्यंत आणखी एक चक्राकार वाऱ्यांची स्थिती होती. कर्नाटक आणि अांध्र प्रदेशमध्ये वाऱ्यांचे पूर्व पश्‍चिम जोडक्षेत्र असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

शुक्रवार (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणांचे किमान तापमान, कंसात किमान तापमानातील तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १३.२ (-३), जळगाव १४.२ (-३), कोल्हापूर १८.६ (-१), महाबळेश्‍वर १३.४ (-२), मालेगाव १५.४ (-१), नाशिक १३.५ (-२), सांगली १६.३ (-३), सातारा १५.२ (-२), सोलापूर १५.१ (-५), सांताक्रूझ १९.८ (-३), अलिबाग २१.२ (-२), रत्नागिरी २०.१ (-३), डहाणू २१.६ (-१), भिरा १८.५ (-३), अौरंगाबाद १६.१ (०), परभणी १५.६(-३), नांदेड १८.५(१), उस्मानाबाद १२.४, अकोला १५.६(-३), अमरावती १५.४(-३), बुलडाणा १६.२(-२), चंद्रपूर १८.४(-४), गोंदिया १५.०(-४), नागपूर १४.१ (-३), वर्धा १५.२(-३), यवतमाळ १३.४(-५). 

मॉन्सूनने घेतला देशाचा निरोप 
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शुक्रवारी (ता. २८) दक्षिण भारतातील राज्यांमधून माघार घेत संपूर्ण देशाचा निरोप घेतला. ८ जून रोजी केरळमध्ये दाखल झालेल्या मॉन्सूनने १३ जुलै रोजी संपूर्ण देश व्यापला. देशात सुमारे चार महिने आणि तीन अाठवडे मुक्काम केला. सर्वसाधारण वेळेनुसार १५ ऑक्टोबर रोजी देशातून परतणारा मॉन्सून यंदा दोन आठवडे उशिराने परतला आहे. दक्षिण भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वाऱ्यांची दिशा बदलल्याने मॉन्सून परतला असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश कर्नाटक राज्यांमध्ये रविवारपासून (ता. ३०) ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून (परतीचा मॉन्सून) पावसाला सुरवात होणार आहे. मंगळवारपर्यंत (ता. १) आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

Web Title: temperature down by 2 celcius