यंदा होरपळ वाढणार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

पुणे - देशात पुढील तीन महिन्यांमध्ये कडक उन्हाळा असेल, असा अंदाज हवामान खात्याने सोमवारी व्यक्त केला. हिमालयाच्या पर्वतरांगा, सिक्कीम आणि पश्‍चिम बंगाल वगळता देशातील इतर भागांत यंदाच्या उन्हाळ्यात कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा जास्त नोंदविला जाईल. तसेच, महाराष्ट्रासह देशाच्या काही भागांत उष्णतेच्या लाटाही येतील, असेही खात्याने सांगितले आहे. 

पुण्यातील उष्णकटिबंधीय भारतीय हवामान संस्थेने (आयआयटीएम) विकसित केलेल्या डायनॅमिक मॉडेलच्या आधारावर हा अंदाज व्यक्त केला आहे. देशातील पावसाचा आणि उन्हाळ्याचा अंदाज या मॉडेलच्या माध्यमातून वर्तविण्यात येतो. गेल्या वर्षी या मॉडेलने प्रथमच उन्हाळ्याचा अंदाज व्यक्त केला होता. या वर्षी मार्चमधील तापमानाचे विश्‍लेषण करून एप्रिल ते जून या तीन महिन्यांमधील उन्हाळ्याच्या तीव्रतेचा अंदाज व्यक्त केला आहे. 

राजस्थान, दिल्ली, गुजरात आणि उत्तर भारतासह महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भात तापमानाचा पारा सरासरीपेक्षा वाढलेला असेल. दक्षिणेतून उत्तर भारतात उष्णतेची लाट वाढत जाण्याची शक्‍यता असून, वायव्य भारतात उन्हाचा चटका सर्वाधिक असेल. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये सरासरीपेक्षा अंशतः तापमान वाढ होईल, असेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. 

एप्रिल ते जून या दरम्यान काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्‍यता आहे. त्यात सरासरी तापमान हे सरासरीपेक्षा वाढलेले असेल अशी 47 टक्के शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, हरियाना, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेश येथे उष्णतेच्या लाटा निर्माण होतील, असा इशाराही दिला आहे. 

"ला निना'चा प्रभाव कमी 
प्रशांत महासागरातील थंड पाण्याचा प्रवाह असलेल्या "ला निना'चा प्रभाव कमी होत आहे, त्यामुळे विषुववृत्ताजवळील भागांत प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान वाढत आहे. मात्र, त्याचा थेट परिणाम भारतीय हवामानावर होणार नाही. जानेवारी 2017 पर्यंत हा शीत पाण्याचा प्रवाह सक्रिय होता, असेही हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले. 

Web Title: Temperature high