उन्हाने राज्य आजही होरपळतंय; पुणे 40 अंश; नंदुरबार 45 अंश! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 एप्रिल 2019

- पुण्यात 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून शहरात आलेली उष्णतेची लाट आजही (शनिवार) कायम आहे. सकाळी अकराच्या सुमारास झालेल्या नोंदीनुसार, पुण्यात 40 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले आहे. केवळ पुण्यातच नव्हे, तर राज्यभरात तापमान प्रचंड वाढले आहे. बीडमध्ये 43 अंश, तर नंदुरबारमध्ये 45 अंश तापमान नोंदविले गेले आहे. 

सकाळी दहापासून सुरू झालेला उन्हाचा चटका आता सायंकाळी पाचपर्यंत जाणवत आहे. गेले सलग चार दिवस पुण्यातील तापमान चाळिशीच्या पलीकडेच आहे. शहरात भर दुपारी फिरताना सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याचे स्पष्ट जाणवत आहे. रस्त्यांवर प्रचंड उन्हाचा चटका, तर घरामध्ये उष्म्याच्या झळा येत असल्याचा अनुभव येत आहे. 

विदर्भात उष्णतेची तीव्र लाट असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्येही ही लाट पसरणार असल्याचा इशारा हवामान खात्यातर्फे काल (शुक्रवार) देण्यात आला होता. काल राज्यातील 25 ठिकाणी कमाल तापमान चाळिशीच्या वर गेले होते. 

शनिवारी महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये नोंदले गेलेले तापमान : 
हिंगोली 45 अंश; बीड 43 अंश; नंदुरबार 45 अंश; पुणे 40 अंश; परभणी 46 अंश; अकोला 46 अंश; महाबळेश्‍वर 35 अंश; नागपूर 44 अंश; नाशिक 42 अंश; मुंबई 34 अंश; औरंगाबाद 42 अंश; नांदेड 44 अंश; पिंपरी चिंचवड 40 अंश


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Temperature in Maharashtra is Increasing Pune 40 Celsius