"व्हॅल्यू चेन्स'मध्ये दहा लाख शेतकरी - मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 4 मे 2018

मुंबई - "कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी गेल्या तीन वर्षांत राज्य शासनाने चारपट गुंतवणूक केली, त्यामुळे कृषी क्षेत्राची उत्पादकता आणि उत्पादन वाढले आहे. व्हॅल्यू चेन्सच्या माध्यमातून राज्यातील दहा लाख शेतकरी जोडले गेले असून, सार्वजनिक खासगी सहभागी तत्त्वावरील एकात्मिक कृषी विकास प्रकल्पांमध्ये राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांचा सहभाग करून घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. 

सार्वजनिक खासगी सहभागी तत्त्वावरील एकात्मिक कृषी विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा मंत्रालयात आज घेण्यात आला. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, की राज्यात कृषी विकासाचे चित्र बदलणारे अनेक प्रकल्प सुरू आहेत. कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी विशेष लक्ष देऊन व्हॅल्यू चेन्स, बाजारपेठांची संलग्नता आणि जागतिक पुरवठा साखळी निर्माण करण्यावर भर दिला आहे. गेल्या तीन वर्षांत चारपट गुंतवणूक कृषी क्षेत्रात करण्यात आल्याने उत्पादन आणि उत्पादकता वाढली आहे. कृषी क्षेत्रातील उत्पादित मालाला योग्य बाजारपेठ मिळण्यासाठी खासगी क्षेत्राचा सहभाग होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. राज्याच्या या कार्याची दखल घेऊन निती आयोगाने देखील कौतुक केले आहे. व्हॅल्यू चेन्स वाढविल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला आश्वस्त बाजारपेठ मिळाली आहे. राज्यात व्हॅल्यू चेन्सच्या माध्यमातून दहा लाख शेतकऱ्यांचा सहभाग झाला असून, तो अधिकाधिक वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. एकात्मिक कृषी विकासाच्या प्रकल्पांना अधिक गती देऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग त्यामध्ये मिळवावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. 

हवामान केंद्राच्या ऍपचे उद्‌घाटन 
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महावेध या स्वयंचलित हवामान केंद्राच्या ऍपचे उद्‌घाटन करण्यात आले. या ऍपच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना तापमान, आर्द्रता, पुढील 15 दिवसांतील हवामान याविषयी रियल टाइम माहिती मिळणार आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वीज पडण्याबाबतचा अंदाज देखील ते वर्तविणार आहे. 

Web Title: ten lakh farmers in Value Chains