जातपडताळणीची दहा हजार प्रकरणे प्रलंबित 

जातपडताळणीची दहा हजार प्रकरणे प्रलंबित 

मुंबई - जातपडताळणी प्रमाणपत्र सहा महिन्यांच्या आत सादर न केल्याने कोल्हापूर महापालिकेतील 19 नगरसेवकांचे नगरसेवकपद सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर राज्य सरकारने तातडीने अधिनियमात सुधारणा करत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याचा कालावधी सहा महिन्यांवरून बारा महिने केला आहे. मंत्रिमंडळाने आज घेतलेला हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने एक एप्रिल 2015 पासून लागू होणार असल्याने सर्वपक्षीय साधारण पाच हजारपेक्षा अधिक नगरसेवकांना याचा फायदा होईल; तर सहा महिन्यांपासून एक वर्षाच्या आत साधारण दोन हजारपेक्षा अधिक प्रकरणे जातपडताळणी समित्यांकडे प्रलंबित असल्याने या सदस्यांना निर्णयाचा थेट फायदा होणार आहे. 

उच्च न्यायालयाबरोबरच सर्वोच्च न्यायालयानेदेखील जातपडताळणी प्रमाणपत्राचा कालावधी सहा महिन्यांपेक्षा वाढवून न देण्याचा निर्णय यापूर्वीच दिलेला असल्याने मंत्रिमंडळाचा हा निर्णय न्यालयाच्या कसोटीवर किती काळ टिकून राहणार आहे, याविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 

राज्यात 2015 पासून ऑगस्ट 2018 पर्यंत 483 मागासवर्गीय सदस्य जातपडताळणी प्रमाणपत्रे सादर करू न शकल्याने अवैध ठरली आहेत; तर जातप्रमाणपत्रासाठी पुरावे सादर न करू शकलेली 3 हजार 198 प्रकरणे समित्यांकडे पडून आहेत. मात्र निवडणूक संबंधित पडताळणी तातडीने पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी दिली. 

राज्याच्या सर्व जातपडताळणी समित्यांकडे 7 हजार 562 प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यात ग्रामपंचायत सदस्यांची 6 हजार 908 प्रकरणे जातपडताळणी विभागाकडे पडून आहेत. त्याखालोखाल महापालिकेतील 443 प्रकरणे जातप्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत आहेत. पंचायत समित्यांची 35, जिल्हा परिषद 6, नगरपालिका 51, नगर परिषद 91 आणि अन्य निवडणुकीतील 91 प्रकरणे प्रलंबित आहेत. 

प्रलंबित प्रकरणे 
7562 - मागासवर्गीय 
1875 - आदिवासी 

4002 - सहा महिन्यांच्या आत अर्ज केलेले 
2137 - सहा महिने ते एक वर्षांपर्यंत अर्ज केलेले 
1423 - एक वर्षापेक्षा जुनी प्रकरणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com