Devendra Fadnavis : 10 हजार कोटींच्या मेगा टेक्स्टाईल पार्कला मंजुरी; 'एवढ्या' लोकांना मिळेल रोजगार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : 10 हजार कोटींच्या मेगा टेक्स्टाईल पार्कला मंजुरी; 'एवढ्या' लोकांना मिळेल रोजगार

मुंबईः मागील काळात अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने टीकेचे धनी ठरलेल्या राज्य सरकारने आज एक मोठी घोषणा केली आहे. तब्बल १० हजार कोटी रुपायांचा मेगा टेक्स्टाईल प्रकल्प महाराष्ट्रात उभारला जात आहे. याबाबतची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे महाराष्ट्रात मोठा प्रकल्प उभा राहात आहे. अमरावती जिल्ह्यात १० हजार कोटींची गुंतवणूक असलेला मेगा टेक्स्टाईल प्रकल्प उभा राहात आहे. या प्रकल्पामुळे थेट १ लाख रोजगार निर्मिती होईल आणि अप्रत्यक्षपणे ३ लाख लोकांना रोजगार मिळेल. ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचं फडणवीस म्हणाले.

हेही वाचाः ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

फडणवीस पुढे म्हणाले, या प्रकल्पामुळे मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. कॉटन बेल्टमध्ये असा कॉटन पार्क उभा राहात असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या परिसरात कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं. या मेगा कॉटन पार्कमुळे राज्याला फायदा होईल, असंही फडणवीस म्हणाले.

राज्याबाहेर गेलेले प्रकल्प

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातून अनेक प्रकल्प परराज्यात जात आहेत. पुण्याच्या तळेगाव येथे होणारा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला. त्यानंतर टाटाचा एअरबस प्रकल्प जो नागपूरमध्ये होणार होता, तोदेखील गुजरातमधल्या वडोदऱ्याला गेला. त्यासोबतच बल्क ड्रग पार्क, मेडिकल डिव्हाईस पार्क हे प्रकल्प राज्याबाहेर गेले. फ्रान्सची बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रन यांचा विमान इंजिन दुरुस्ती आणि देखभालीचा प्रकल्प नागपूर येथे होणार होता. परंतु हा प्रकल्प हैदराबादला गेला. मात्र २०२१मध्येच सॅफ्रन प्रकल्प हैदराबादला गेल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं.

टॅग्स :AmravatiDevendra Fadnavis