अधिवेशनात विरोधकांची कसोटी

अधिवेशनात विरोधकांची कसोटी

सरकारच्या चहापानावर बहिष्कार?; नोटाबंदी, मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजण्याची शक्‍यता
मुंबई - विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने कॉंग्रेस आघाडीत पडलेली फूट आणि नगरपालिका निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेसला आलेल्या अपयशामुळे निष्प्रभ ठरलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीसाठी नागपूर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात कसोटी लागणार आहे, तर दुसरीकडे पालिका निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशामुळे सत्ताधारी भाजप आणि शिवसेना युती अधिवेशनाला आत्मविश्‍वासपूर्वक सामोरे जाण्यासाठी सज्ज झाली आहे.

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून (ता. 5) नागपूर येथे सुरवात होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथेप्रमाणे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षासाठी चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे; मात्र सरकारच्या विरोधात नव्या मुद्यांच्या शोधात असलेला विरोधी पक्ष चहापानाकडे पाठ करून बहिष्काराची परंपरा कायम ठेवण्याची शक्‍यता आहे. 5 ते 17 डिसेंबरपर्यंत दोन आठवडे चालणाऱ्या अधिवेशनात नोटाबंदीमुळे सामान्य जनता, तसेच शेतकऱ्यांना होत असलेला त्रास, मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र, मराठा मोर्चा आणि प्रतिमोर्चांमुळे ढवळून निघालेले समाजमन, मराठा आरक्षण, उपराजधानी नागपूरमध्ये सुरू असलेले खून, दरोड्यांचे सत्र आदी प्रश्‍न गाजण्याची शक्‍यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बाद करण्याचा निर्णय घेऊन 26 दिवस उलटले, तरी शेतकरी, सर्वसामान्यांचा त्रास कमी झालेला नाही. बॅंक खात्यातील स्वतःचे पैसे काढण्यासाठी आजही लोकांना बॅंक, एटीएमसमोर रांगा लावाव्या लागत आहेत. नोटाबंदीचा सर्वाधिक त्रास शेतकऱ्यांना होत आहे. खरीप हंगामाचे पीक बाजारात आणूनही शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. पैसा नसल्याने रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत सापडला आहे. जुन्या नोटा हव्या असतील, तर जास्त भाव आणि नव्या नोटा पाहिजे असतील, तर कमी भाव, असे सांगून व्यापारी शेतकऱ्यांची अडवणूक करत आहेत. नोटाबंदीनंतरच्या दुष्परिणामांचे मुद्दे सभागृहात लावून धरण्याची तयारी विरोधी पक्षाने केली आहे.

कोपर्डीतील घटनेनंतर राज्यात मराठा समाजाचे ठिकठिकाणी लाखोंच्या संख्येने मोर्चे निघाले. सप्टेंबर आणि ऑक्‍टोबर महिन्यांतील मराठा क्रांती मोर्चांनी राज्यातील वातावरण तापले होते. मराठा समाजाला आरक्षण आणि ऍट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती करण्याची मागणी मराठा समाजाने लावून धरली आहे. मराठा समाजाच्या मोर्चांनंतर ओबीसी, दलित, मुस्लिम समाजाने एकत्रित मोर्चे काढले. 9 डिसेंबरला ओबीसी समाजाचा, तर 14 डिसेंबरला मराठा समाजाचा नागपूरला मोर्चा निघणार आहे. या मोर्चांचे पडसाद अधिवेशनावर उमटण्याची शक्‍यता आहे. याशिवाय नागपूर शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्यावरून विरोधी पक्ष मुख्यमंत्र्यांना घेरू शकतो.

दरम्यान, अधिवेशनात विधानसभेतील दोन, तर विधानपरिषदेतील सहा प्रलंबित विधेयकांवर चर्चा होईल. चार नवीन, तसेच 11 प्रख्यापित अध्यादेशांवर दोन्ही सभागृहांत चर्चा होणार आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विधिमंडळ सचिवालयाने विशेष चर्चासत्राचे आयोजन केले आहे.

खालील मुद्यांवर अधिवेशन गाजणार
नोटाबंदीनंतर होणारे सर्वसामान्यांचे हाल
शेतकऱ्यांना दिलासा देण्यात सरकारला आलेले अपयश
मराठा क्रांती आंदोलन आणि आरक्षणाची मागणी
वाढती गुन्हेगारी आणि गृह खात्याचे अपयश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com