
सोमय्यांच्या अडचणी वाढणार? मुश्रीफानंतर अनिल परबांच्या चौकशी प्रकरण अंगलट
भाजप नेते किरीट सोमय्यांना मोठा दणका मिळाला आहे. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यावर म्हाडाची जमीन हडपल्याचा आरोप सोमय्या यांच्याकडून करण्यात आला होता. या आरोपांप्रकरणी म्हाडाकडून परब यांना नोटीसदेखील दिली होती.
मात्र म्हाडाने नंतर ती नोटीस मागे घेतली. सातत्याने होत असलेल्या आरोपांमुळे अनिल परब यांनी विधान परिषदेत किरीट सोमय्या यांच्यासह म्हाडाच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रकारानात माझी नाहक बदनामी झाल्याचं परब म्हणाले. त्यामुळे प्रस्ताव मांडलाय.
हा प्रस्ताव हक्कभंगाचा प्रस्ताव विधिमंडळाच्या विशेष हक्क समितीकडे पाठवावा अशी विनंती त्यांनी केली आहे. त्यामुळे आता किरीट सोमय्यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
दरम्यान हसन मुश्रीफ प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. न्यायालयाने किरीट सोमय्यांविरोधात न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.
हसन मुश्रीफ प्रकरणाशी कोणताही थेट संबंध नसताना किरीट सोमय्यांना कोर्टाच्या आदेशांची तसेच एफआयआरची कॉपी सर्वात आधी कशी उपलब्ध होते? असा सवाल देखील न्यायालयाने केला. या प्रकरणी पुणे सत्र न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीशांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.