ठाकरे पुनश्‍च: हरिओम म्हणाले अन्‌ सोलापुरात कोरोनाचे 982 रुग्ण वाढले 

प्रमोद बोडके
Monday, 22 June 2020

साप्ताहिक सुट्टीने जाईल का कोरोना? 
सोलापूर महापालिकेच्या हद्दीतील दुकाने व आस्थापना आठवडाभर सुरू राहत आहेत. सोलापुरातील प्रमुख चौकांमधील सिग्नल सुरू ठेवण्याची वेळ मिशन पुन: प्रारंभपासून आली आहे. सोलापुरातील बहुतांश चौक गर्दीने फुलले आहेत. आठवड्यातील एक दिवस रविवारी या दुकानांना सुट्टी देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. आठवडाभर संपूर्ण शहर मोकळे सोडून आणि आठवड्यातील एक दिवस साप्ताहिक सुट्टी व कडक नियम पाळून कोरोना जाईल का? असाच सवाल उपस्थित होत आहे. 

सोलापूर : कोरोनाचे संकट संपणार कधी? हाच प्रश्‍न सर्वांच्या मनात पडला आहे. सध्या तरी या प्रश्‍नाला उत्तर मिळताना दिसत नाही. राज्यातील विस्कटलेली आर्थिक घडी बसविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 5 जूनपासून राज्यातील लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता आणली आहे. मिशन पुन: प्रारंभची सुरुवात करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुनश्‍च: हरिओमची घोषणा दिली. 4 जून ते 21 जून या 18 दिवसांमध्ये सोलापुरात 982 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

कोरोना आटोक्‍यात आणण्यासाठी हाताबाहेर गेलेल्या शहरांमध्ये सोलापूर शहराचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. आज किती वाढले? आणि कोरोनाने आज किती जणांचा बळी घेतला? एवढेच आकडे मोजण्याचे काम सध्या सोलापूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांना राहिले आहे. आजच्या अहवालात आपल्या भागातील रुग्ण नाही एवढीच काय ती दिलासा देणारी गोष्ट सोलापूर शहर व जिल्ह्यातील नागरिक रोजच्या कोरोना अहवालातून शोधत आहेत.

12 एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सोलापुरात आढळला. या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर तो कोरोनाबाधित असल्याचे समोर आले. 12 एप्रिल ते 22 जून अवघ्या 73 दिवसांमध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती भीषण झाली आहे. 21 जूनच्या अहवालानुसार सोलापूर शहर व जिल्ह्यात सध्या 2 हजार 126 कोरोनाबाधित आहेत तर 181 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 1 हजार 118 जण कोरोना मुक्त झाले आहेत. 

4 जून रोजी सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या 1 हजार 144 एवढी होती. 99 लोकांचा 4 जूनपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला होता तर 484 जण कोरोनामुक्त झाले होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर 5 जून ते 21 जून या 18 दिवसांच्या कालावधीत सोलापूर शहर व जिल्ह्यात 982 कोरोनाबाधित वाढले आहेत. या 18 दिवसांमध्ये तब्बल 82 जणांचा मृत्यू झाला आहे तर 634 जण कोरोना मुक्त झाले आहेत.

मिशन पुन: प्रारंभमध्ये 5 जूनपासून बिगर प्रतिबंधित क्षेत्रातील दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू करण्यात आली आहे. खासगी, सार्वजनिक वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. या मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात 8 जूनपासून खासगी कार्यालये सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिशन पुन: प्रारंभची घोषणा केली परंतु या घोषणेनंतर कोरोना विरुद्धच्या लढाईत नागरिक आणि प्रशासन पूर्वीच्या तुलनेत बिनधास्त झाल्याचे दिसत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thackeray: Hari om said that the number of corona patients has increased to 982 in Solapur