
Shiv Sena News : पुन्हा ठाकरेंना धक्का! नाव गेलं, चिन्ह गेलं आता कार्यालयही…
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे शिंदे गटाला मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर आता विधिमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा शिंदे गटाने घेतला आहे.
आज यासंबंधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट शिंदे गटातील आमदार घेणार होते. यावेळी विधिमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालय आम्हाला मिळावं अशी मागणी हे आमदार करणार असल्याची माहिती समोर आली होती.
यातच आता शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले आणि इतर शिंदे गटातील आमदारांनी कर्यालयावर हक्क सांगत त्याचा ताबा घेतला आहे. यावेळी शिवसेनेच्या इतर कार्यालयांचा ताबा देखील घेण्याचा कायदेशीर प्रयत्न आम्ही करणार आहोत असे गोगावले यांनी सांगितले.
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे येत्या २७ तारखेला सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने टाकलेलं हे पहीलं पाऊल असल्याचे बोलले जात आहे.
अरविंद सावंत काय म्हणाले..
याच अश्चर्य वाटण्याचं कारण नाही. त्यांचा उन्माद हा असाच असणार हे अपेक्षित होतं. यासंदर्भात आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो पण त्याची वाट पाहायला ते कुठे तयार असतील? निवडणूक आयोगाचा निकाल पाहाता हे आपलालाच मिळणार हे त्यांना माहिती होतं.
हे सगळं विकलं गेलेलं आहे म्हणूनच ते आधीपासून हे आम्हालाच मिळणार असं सांगत होते. संस्था विकल्या गेल्या हे सगळ्या जगाला कळतंय. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. आम्ही सर्वोच्च न्यायलयात गेलो आहोत काय निर्णय येतो पाहू असे ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत म्हणाले.