Narayan Rane: येत्या दोन महिन्यात नारायण राणे यांचं मंत्रिपद जाणार, कोकणातल्या नेत्याचा गौप्यस्फोट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Narayan Rane

Narayan Rane: येत्या दोन महिन्यात नारायण राणे यांचं मंत्रिपद जाणार, कोकणातल्या नेत्याचा गौप्यस्फोट

गेल्या काही दिवसांपासून कोकणात ठाकरे गट आणि राणे कुटुंबीयांची चांगलीच जुंपल्याचं दिसून येत आहे. दोघांकडून एकमेकांवर कडाडून टीका केली जात आहे. कधी नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत तर कधी वैभव नाईक विरुद्ध नितेश राणे यांच्यातील शाब्दिक चकमक होताना दिसते. कोकणातील राजकारण वारंवार तापलेलं दिसून येत आहे.

अशातच आता ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी थेट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लक्ष केलं आहे. नारायण राणे यांचं केंद्रीय मंत्रिपद अवघ्या दोन महिन्यात जाणार असल्याचं वैभव नाईक यांनी म्हंटलं आहे. वैभव नाईक यांच्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नाईक यांच्या या विधानामुळे कोकणात पुन्हा एकदा नारायण राणे यांचं मंत्रिपद जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

काय म्हणालेत वैभव नाईक?

येत्या दोन महिन्यात नारायण राणेंच मंत्रिपद जाणार आहे, असा गौप्यस्फोट आमदार वैभव नाईक यांनी केलाय. आतापर्यंत इतरांचं राजकीय अस्तित्व ठरविणाऱ्या नारायण राणेंच राजकीय अस्तित्व आता भाजप ठरवणार आहे.

भाजपला राणेंची राजकीय दृष्टया गरज नाही. त्यामुळं राणेंना राजीनामा द्यावा लागणार असल्याचं वैभव नाईक यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे नारायण राणे यांचं मंत्रिपद जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. नाईक यांनी राणेंचं मंत्रिपद का जाणार याचं कारणही यावेळी त्यांनी सांगितलं आहे. वैभव नाईक यांच्या या विधानावर भाजपकडून किंवा नितेश राणे, निलेश राणे यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रीया आली नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.