पेट्रोलपंपात फेरफार करणारी आंतरराष्ट्रीय टोळी उध्वस्त करण्यात पोलिसांना यश

श्रीकांत सावंत
बुधवार, 12 जुलै 2017

चीन, दक्षिण आफ्रिका आणि अबुदाबीमध्येही चिपचे वितरण

चीन, दक्षिण आफ्रिका आणि अबुदाबीमध्येही चिपचे वितरण

ठाणे : पेट्रोल पंपातील इंधन वितरण यंत्रामधील डिजीटल फेरफार करून इंधन चोरी करणाऱ्या देशव्यापी जाळे उध्वस्त करण्यात ठाणे पोलिसांना यश मिळाले आहे. राज्यभरामध्ये 16 जिल्ह्यातील 98 पेट्रोल पंपावर ठाणे पोलिसांनी धाडी टाकून त्यापैकी 75 पेट्रोलपंप सिल केले आहे. या प्रकरणात दोन पेट्रोल पंप मालक, सहा पेट्रोलपंप मॅनेजर, 12  टेक्नीशीयन, तीन स्वॉफ्टवेअर इंजिनीअर अशा 23 जणांचा समावेश असून, सगळे अजून गजाआड आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रशांत नुलकर हा मुख्य आरोपी असून, या प्रकरणामध्ये त्याचा सर्वाधिक सहभाग आहे. त्याचे गोवा इथे एक तर कोल्हापुरमध्ये दोन पेट्रोलपंप असल्याची माहिती ठाणे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली. यासाठी लागणारी चिप चिनमधून मागवण्यात येत होती त्यानंतर त्यामध्ये फेरफार करून चीन, दक्षिण आफ्रिका आणि अबुदाबीमध्येही पाठवली जात होती.

राज्यातील 75 पेट्रोलपंप चोरी तर अन्य संशयाच्या भोवऱ्यात
ठाणे जिल्ह्यातील पेट्रोल पंपाच्या आरोपींच्या अटकेनंतर राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथुर यांच्या परवानगीने ठाणे पोलिसांनी राज्यव्यापी छापासत्र सुरू केले होते. ठाणे पोलिसांची विविध पथके दररोज प्रत्येक जिल्ह्यामध्ये कारवाई करत होती. महाराष्ट्रातील एकूण 16 जिल्ह्यातील 96 पेट्रोलपंपावर कारवाई करण्यात आलेली असून त्यामध्ये आय.ओ.सी.एल - 48, एच.पी.सी.एल - 36, बी.पी.सी.एलर - 08, इसार 04 यांचा समावेश आहे. छापे टाकलेल्या पेट्रोल पंपावरुन एकूण 195 पल्सर कार्ड, 22 सेन्सर कार्ड, 71 कंट्रोल कार्ड व 61 की पॅड जप्त करुन संबंधीत कंपनीच्या लॅबकडे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत. या गुन्ह्यामध्ये एकूण 23 आरोपींना अटक आली असून त्यामध्ये पेट्रोल पंप मालक 2, पेट्रोल पंप मॅनेजर 6, टेक्नीशीयन 12, स्वाॅप्टवेअर इंजिनीअर 03 यांचा समावेश आहे. तसेच 14 पेट्रोलपंपाचे मालक चालक यांचे अटक पूर्व जामीन कल्याण सत्र न्यायालयाने फेटाळले आहेत.

डिजीटलायझेशन नंतर चोरी सुरू...
पेट्रोल वितरण यंत्राचे 2009 साली डिजीटलायझेशन झाल्यानंतर या आरोपींनी 2010 पासून अशाप्रकारची इंधन चोरी सुरू केली. साधारण 10 ते 20 मिली पर्यंत इंधन कमी मिळाल्यास ते नियमाप्रमाणे आहे. परंतु या यंत्रातील छेडछाडीमुळे 40 मिली पासून ते 700 मिली पर्यंत इंधन कमी दिले जात असल्याचे पोलिसांना दिसून आले. अटक आरोपी पेट्रोल मालक, मॅनेजर असले तरी त्यापैकी अनेकजण या पेट्रोल पंपाचे मशिनसाठी साहित्य पुरवणाऱ्या कंपन्यांशीही सलग्न आहे. त्यामध्ये मिडको, गिलबर्गो, टोकहेम या पेट्रोलपंप युनीटचे उत्पादन करणाऱ्या कंपनीतील टेक्नीशीयन (फीटर), सर्व्हीस इंिजनियर तसेच खाजगीरित्या टेक्नीशियनचे काम करणारे आहेत. सर्व आरोपी आर्थिक फायद्यासाठी विवेक शेट्ये याने व त्याचे अन्य साथीदार यांनी साॅफ्टवेअर प्रोग्रामिंग सेट केलेले आय.सी. मिडको व दिलबर्गो या कंपनीचे पेट्रोलपंपाचे युनीटचे नोझलमधील मुळ पल्सरकार्डवर लावत असत. इंिजनिअर मिनल नेमाडे यांनी टोकीयम पेट्रोलपंपाचे मदरबोर्डमध्ये प्रोग्रामिंग केलेले साॅफ्टवेअर इन्स्टाॅल करुन त्याद्वारेही पेट्रोल चोरी केली जात होती.

वैधमापन आणि पेट्रोलियम कंपन्यांचा सहभाग...
या प्रकरणामध्ये वैधमापन शास्त्र विभागाने लावलेले अधिकृत सील तोडून त्यातील पल्सरकार्डमध्ये छेडछाड केली जात होती. तसेच कारवाई सुरू झाल्यानंतर त्यामध्ये दुरूस्ती करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यासाठी वैधमापन विभागाचे स्टॅंम्पचाही वापर करण्यात आल्यामुळे वैधपापन विभागाच्या अधिकाऱ्यांचाही यामध्ये सहभाग असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. पेट्रोलियम कंपन्यांचा यामध्ये सहभाग नसला तरी त्यांचे काही कर्माचारी त्यामध्ये सहभागी असण्याची शक्यता आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रणवीर बयेस, गुन्हे शाखा घटक एक हे करित आहेत. या प्रकरणी 14 आरोपी अटक करण्यात आले असून पेट्रोल पंपावरही कारवाई करण्यात आले आहे. कारवाई सुरू झाल्यानंतर आरोपींनी पेट्रोलपंप नादुरूस्त असल्याचे भासवणे आणि युनिट बंद ठेवल्याचे सांगून कारवाई टाळण्याचा प्रयत्न केला आहे. तर काहींनी कारवाई सुरू झाल्यानंतर युनिटमध्ये फेरफार करून नव्याने यंत्रणा कार्यान्वित करण्यास सुरूवात केल्याचेही पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. पोलिस आय़ुक्त परमबीर सिंह, पोलिस सह आयुक्त मधुकर पाण्डेय, अपर पोलिस आयुक्त गुन्हे मकरंद रानडे यांच्या आदेशावरून पोलिस उप आयुक्त अभिषेक त्रिमुखे, सहाय्यक पोलिस आयुक्त मुकुंद हातोटे यांच्यासह गुन्हे शाखा घट एकचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक नितीन ठाकरे, शितल राऊत जयराज रणवरे यांच्यासह अधिकारी आणि कर्माचाऱ्यांनी हा कारवाई पुर्ण केली.

पेट्रोल पंप घटनेची पार्श्वभूमी...
ठाणे गुन्हे शाखा घटक एक चे वरिष्ठ पोलिस निरिक्षक नितीन ठाकरे यांना पेट्रोलपंपातील तांत्रिक  फेरफार केल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार उत्तरप्रदेश पोलिस स्टेशन मधील अटक असलेला आरोपी विवेक हरिश्चंद्र शेट्ये याने त्याच्या साथिदारांच्या मदतीने पेट्रोलपंपाचे डिस्पेन्सर युनिटमध्ये असलेले पल्सर इलेक्ट्राॅनिक किट- कार्ड यावर लावण्यात येणारे मुळ कंपनीचे प्रोग्राॅम केलेले आय.सी. काढून त्या एेवजी स्वतः प्रोग्रामिंग केलेले आय.सी. बसवले होते. महाराष्ट्र व इतर राज्यातील पेट्रोलपंपाचे डिस्पेन्सींग युनीटमध्ये लावण्यात येणाऱया पल्सर युनीटवर - चिपवर अशा प्रकारच्या आय.सी. लावल्यामुळे ग्राहकांना डिस्पेन्सर युनिटवर लावलेल्या डिस्प्लेवरील रिडींगमध्ये दिसणाऱया वितरण अंकापेक्षा कमी प्रमाणात पेट्रोल किंवा डिझेल वितरित होते. सदर विवेक शेट्ये यांनी व त्याच्या साथिदारांनी वितरीत केलेले अशाप्रकारचे प्रोग्रामिंग केलेले आय.सी. हे ठाणे पोिलस आयुक्तालयातील कल्याण शिळ रोडवरील असमान सेल्स या इंडीयन आॅईलचे पेट्रोलपंपावरील डिस्पेन्सींग युनिट मध्ये लावले असून त्यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे. याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली होती. यावरुन अरमान सेल्स या पेट्रोलपंपावर दिनांक 16 जुन रोजी गुन्हे शाखेने छापा टाकला होता. या प्रकरणाच्या माहिती आधारे पोलिसांनी राज्यव्यापी तपास सुरू केला.

कारवाई करण्यात आलेले पेट्रोलपंप...

 • ठाणे- 28
 • रायगड - 7
 • मुंबई - 2
 • नाशिक -12
 • पुणे - 12
 • सातारा - 6
 • औरंगाबाद - 6
 • नागपुर - 5
 • कोल्हापुर - 5
 • रत्नागिरी - 2
 • धुळे - 3
 • यवतमाळ -2
 • चंद्रपुर - 2
 • जळगाव - 2
 • सांगली - 1

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: thane news international network arrested interrupting the petrol pump