थँक्‍यू डॉक्‍टर...मिळाला मातृत्वाचा हक्क ! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

गर्भाशय प्रत्यारोपणाच्या देशातील पहिल्या सलग दोन शस्त्रक्रिया पुण्यातील गॅलॅक्‍सी केअर हॅस्पिटलमध्ये वर्षापूर्वी झाल्या. त्यातील दुसरी शस्त्रक्रिया ज्यांच्यावर करण्यात आली, त्या अहमदाबादच्या मीनाक्षी वालंद बोलत होत्या.

पुणे : ""डॉक्‍टर नसते तर हे शक्‍य झालेच नसते...'' या एकाच वाक्‍यानंतर "तिचा' कंठ दाटून आला. डोळ्यांतील अश्रू अडविण्याचा कसोशीने ती प्रयत्न करत होती. पण क्षणाक्षणाला तिच्या भावना उचंबळून येत होत्या. या भावनांना आवर घालत "थॅंक्‍यू डॉक्‍टर' असे शब्द त्यांच्या तोंडातून सहजतेने बाहेर पडले. 

जागतिक डॉक्‍टर दिन येत्या रविवारी (ता. 1) साजरा होत आहे. त्या निमित्ताने योग्य वेळी अचूक रोगनिदान करून त्यावर प्रभावी उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांना सर्व रुग्ण मनापासून धन्यवाद देतात. खडखडीत बरा झालेल्या या व्यक्तींच्या नेमक्‍या भावनांना वाट मोकळी करून देणारी "थॅंक्‍यू डॉक्‍टर' ही वृत्तमालिका आजपासून प्रसिद्ध करीत आहोत. 

गर्भाशय प्रत्यारोपणाच्या देशातील पहिल्या सलग दोन शस्त्रक्रिया पुण्यातील गॅलॅक्‍सी केअर हॅस्पिटलमध्ये वर्षापूर्वी झाल्या. त्यातील दुसरी शस्त्रक्रिया ज्यांच्यावर करण्यात आली, त्या अहमदाबादच्या मीनाक्षी वालंद बोलत होत्या. प्रत्यारोपण केलेल्या गर्भाशयात यशस्वीपणे गर्भ सोडण्यात आला आहे. त्या आता तीन महिन्यांच्या गर्भवती आहेत. त्यांना मातृत्वाचा हक्क मिळावा, यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे गॅलॅक्‍सी केअर हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश पुणतांबेकर आणि स्त्रीरोग आणि प्रसूतितज्ज्ञ डॉ. मिलिंद तेलंग यांचे मीनाक्षी यांनी आभार मानले आहेत. 

""मला सरोगसी किंवा दत्तक हे दोन्हीही पर्याय नको होते. माझं मूल माझ्या उदरात वाढवायची प्रचंड इच्छाशक्ती होती. त्यामुळे गर्भाशय प्रत्यारोपणानंतर आता तीन महिन्यांचा गर्भ माझ्या उदरात वाढत आहे. डॉक्‍टरांनी गर्भाशय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली नसती, तर हे निश्‍चित शक्‍य झाले नसते,'' अशी भावना व्यक्त करत असताना मीनाक्षी यांचा कंठ दाटून आला. डोळ्यांत तरळणाऱ्या अश्रूंना वाट मोकळी करून देत त्यांच्या तोंडातून फक्त "थॅंक्‍यू डॉक्‍टर' हे शब्द बाहेर पडले. 

Web Title: Thank you Doctor doctors day