'तो' क्षण पुन्हा आला! 70 वर्षांची वधु अन् ७२ वर्षांचा वर; धुमधडाक्यात पार पडला विवाह सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

marriage

'तो' क्षण पुन्हा आला! 70 वर्षांची वधु अन् ७२ वर्षांचा वर; धुमधडाक्यात पार पडला विवाह सोहळा

करंजी : एकीकडे लग्नसराईचे दिवस, त्यामुळे सगळीकडेच लग्नाचा धुमधडाका सुरु आहे. तर दुसरीकडे अनेक तरुण विवाहाच्या प्रतिक्षेत अशी अशा विचित्र परिस्थितीत कौडगाव ता. पाथर्डी येथे आहे. मात्र येथे झालेल्या आगळ्या-वेगळ्या विवाह सोहळ्याची चर्चा जोरात सुरू आहे.

कौडगाव ( आठरे ) ता. पाथर्डी येथील बडेकर यांच्या वस्तीवर नातेवाईक, मंडप, वाजंत्री, लाऊडस्पीकरचा गोंगाट सुरु झाला. नातेवाईक, मित्रमंडळींची धावपळ सुरु होती, मंगलाष्टक सुरु झाले.

वधु-वर हार-तुरे घेवून तयार होते, वधु आणि वर यांचे वय ७० च्यापुढे असल्याचे पाहुन चौकशी केली असता समजले, रोहिदास धुराजी बडेकर (वय ७२) यांच्या हौशी मुलांनी आपल्या आई -वडीलांच्या लग्नाचा वाढदिवस पुन्हा एकदा लग्न समारंभासारखाच परंतु आगळ्या-वेगळ्या पध्दतीने साजरा केला.

रोहिदास धुराजी बडेकर (वय ७२ वर्ष) हे मुंबई महानगरपालिकेत नोकरीला होते. त्यांचे लग्न ६ मे १९७३ रोजी खांडके ता. नगर येथील परीगा नेताजी ठोंबे हिच्याशी झाले. त्यांना दिलीप, श्रीपत आणि संपत अशी तीन मुले आहेत. महानगरपालिकेत काम करुन रोहिदास बडेकर यांनी तिन्ही मुलांना शिकवून मुंबईतच नोकरीस लावले. त्यांच्यावर चांगले संस्कार केले.

ते २००६ साली निवृत्त झाल्यानंतर शेती करण्यासाठी आपल्या गावी आले. आपल्या आई-वडिलांचे आपल्यावर मोठे ऋण आहे, आज आपण त्यांच्यामुळेच येथे आहोत, त्यांचे ऋण कसे फेडले पाहिजे म्हणुन त्यांनी आपल्या आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस लग्न करुनच साजरा करायचे ठरविले.

त्यानुसार त्यांनी नातेवाईक, मित्रमंडळी, परिसरातील सर्व लोकांना लग्नाप्रमाणेच निमंत्रण दिले. लग्नात असणारा सगळा थाट-माट, उपस्थितांना मिष्टान्न भोजन देवुन हा लग्नाचा वाढदिवस आगळ्या-वेगळ्या पध्दतीने साजरा केला. अशा या लग्नाच्या ५० व्या वाढदिवशी पुन्हा लग्न करून लग्नाचा वाढदिवसाची चर्चा परिसरात रंगली आहे.

"आई-वडिलांनी शिकवले मोठे केले. त्यांचे आपल्यावर असलेले ऋण फेडण्यासाठी आपण त्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्यासाठी काही तरी केले पाहिजे एवढाच या मागचा उद्देश आहे."

- संपत बडेकर (मुलगा)