महात्मा फुलेंनी घडवून आणलेल्या संपाचं कौतुक थेट अमेरिकेत झालं होतं

नाभिकांचा संप घडवून विधवा केशवपनाच्या प्रथेला संपवण्याचं क्रांतिकारी पाऊल महात्मा जोतिबा फुले यांनी उचललं. महात्मा जोतीराव फुले यांची आज जयंती
mahatma phule strike in punes
mahatma phule strike in punessakal

संप म्हणजे कामगारांना त्यांचं हक्क मिळवण्याचं प्रमुख हत्यार. पण वारंवार घडून येणारे संप, सरकार-कामगार नेते मालक वर्ग यांच्यातील आडमुठी भूमिका यातून कामगारांचं हे हत्यार बोथट होत आहे. प्रचंड ताणलेल्या संपातून कामगारांना त्यांचा हक्क मिळेल याची शाश्वती तर नाहीच शिवाय यातून सर्वसामान्य जनता संपाला वैतागताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा गोंधळ हे याचं प्रमुख उदाहरण. सरकार आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या वादात या संपाचा तोडगा न निघाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र भरडला गेलेला आहे.

ही झाली आजची स्थिती. मात्र एक काळ असा होता जेव्हा संपाचा उपयोग कामगारांच्या फायद्यासाठी होत होताच पण त्यातून समाजाच्या उत्कर्षाची देखील पायाभरणी केली जात होती. याच सर्वात मोठं उदाहरण म्हणजे महात्मा जोतिबा फुले यांनी पुण्यात घडवून आणलेला नाभिकांचा संप.

mahatma phule strike in punes
‘दीनबंधू’ महात्मा जोतिराव फुले

एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्र अनेक अनिष्ठ रूढी परंपरा यांनी जखडला गेलेला होता. यातीलच एक अघोरी प्रथा म्हणजे विधवांचे केशवपन.

विधवा केशवपनाची प्रथा मुख्यतः ब्राह्मण समाजात पाळली जात होती. पती निधनानंतर त्या विधवेचे केस न्हाव्याकडून भादरण्याचा विधी व्हायचा. अनेक तरूण विधवा या विधीला विरोध करीत. तिचे केस भादरले नाहीत, तर मृत पतीच्या आत्म्याला सद्गती प्राप्त होत नाही, असा समज होता. म्हणून तिचे हातपाय बांधून जबरदस्तीने केस भादरले जात. या स्त्रियांना आयुष्यभर दर महिन्याला या प्रकारातून जावे लागे. विधवा केशवपन ही प्रथा अनिष्ट तर होतीच मात्र स्त्रियांचा अपमान करणारी देखील होती.

याच काळात पुण्यात दीनदलित समाज व महिलांच्या उत्कर्षाचा वसा महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने आपल्या शिरावर घेतला होता. त्यांनी मुलींची शाळा सुरु करून स्त्रीशिक्षणाची पायाभरणी तर केलीच शिवाय बालविवाहास विरोध, विधवा विवाहास प्रोत्साहन, द्विभार्या विवाह प्रथेस विरोध अशा अनेक स्त्रीवादी भूमिका घेऊन समाजप्रबोधनाचा प्रयत्न जोरदारपणे राबवला होता. प्रसंगी सनातन्यांचा विरोध पत्करला पण आपली भूमिका सोडली नाही.

विधवा केशवपणााची अघोरी प्रथा बंद पडली पाहिजे हे महात्मा फुलेंचं ठाम मत होतं. या महिला कुणाच्या तरी कन्या, बहिणी, माता आहेत, त्यांना सन्मान मिळाला पाहिजे अशी व्यापक भूमिका त्यांची होती पण तो प्रश्न सोडवण्यासाठीचा मार्ग सापडत नव्हता. विधवा केशवपन थांबवण्यासाठी त्यांना संधी मिळाली ती १८६५ साली.

झालं असं होतं की त्यावर्षी पुण्यात पुरुषांच्या हजामतीचे आणि विधवांच्या केशवपनाचे दर वाढविले, या कारणावरून संघर्ष निर्माण झाला होता. या संधीचा योग्य फायदा घेण्याचे धोरण जोतिबा फुले यांनी आखले. केशवपन प्रथेची अनिष्टता, त्यातील अमानुषता, क्रौर्य यांविषयी नाभिकांना समजावून सांगितले. केशवपन पाळले जायचा अशा सनातनी समाजात देखील त्यांनी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. सुरवातीला महात्मा फुलेंना अल्पसा पाठिंबा मिळाला.मंत्रात खचून न जाता त्यांनी केशवपन प्रथेला कोणत्याही शास्त्रात आधार नाही, ही वस्तुस्थिती अनेकांना समजावून सांगितली.

संप करणाऱ्या नाभिकांपुढे महात्मा फुलेंनी भाषण केलं. त्यांच्या आग्रहामुळे विधवांचे केशवपन न करण्याचा निर्धार पुण्यातील नाभिकांनी केला. संपूर्ण राज्यात या अनोख्या संपाची चर्चा सुरु झाली.

सनातनी वर्गातून देखील काही सुधारक तरुण जोतिबांच्या बाजूने उभे राहू लागले. विधवा महिलांची देखील या लढ्याला सहानुभूती निर्माण झाली. विधवा केशवपनाच्या प्रश्नाची तत्कालीन मोठ्या खपाच्या आणि लोकप्रिय वर्तमानपत्रातून जाहीर चर्चा होऊ लागली होती. त्यामध्ये मामा परमानंद, न्या. रानडे यांच्यासारखे विद्वान भाग घेत होते. लोकमत विधवांच्या बाजूने अनुकूल होत होते.

"विधवेचे जबरदस्तीने केशवपन करणाऱ्या माणसाविरुद्ध जो फिर्याद करील त्याला कोर्टात खटला चालविण्यासाठी खर्च देण्यात येईल" अशी एकदा 'इंदुप्रकाश'मध्ये जाहिरात आली. आणि ही अशी जाहिरात देणाऱ्याचे; मामा परमानंद यांनी लेख लिहून अभिनंदन केले. विधवा केशवपनाच्या विरोधात जनजागृती वाढली. अनेकांनी ही प्रथा पाळण्यास नकार दिला.

विधवा केशवपनाच्या प्रथेवर जोरदार घाव घातला तो महात्मा फुलेंनी सुरु केलेल्या नाभिकांच्या संपाने. फक्त पुण्यातच नाही तर जगभरात या संपाचं कौतुक झालं. विशेषतः अमेरिकेतील स्त्रीवादी चळवळीकडून त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली. त्यांनी तार पाठवून जोतिबांचे अभिनंदन केले. मानवमुक्ती, शोषणमुक्तीच्या लढ्याचे महत्त्वाचे अंग म्हणजे स्त्रीमुक्ती चळवळ होय. याचे महत्त्व सत्यशोधक जोतिबा फुले यांनी ओळखले. म्हणून त्यांचे अभिनंदन अमेरिकेतील स्त्रीमुक्ती चळवळीने आणि इंग्रज महिलांनी केले.

mahatma phule strike in punes
Video: महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमित्त नागपुरात बाईक रॅली

पुढील काळात फक्त पुण्यातच नाही तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नाभिक समाजाने विधवा केशवपनाविरुद्ध संप केला. इ.स. १८९० मध्ये मुंबई येथे केशवपन प्रकरणावरून तीव्र वादविवाद झाले. वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरून मजकूर प्रसिद्ध होऊ लागला. 'दीनबंधू', "इंदुप्रकाश', 'इंडियन स्पेक्टेटर', 'सुबोधपत्रिका' या पत्रांनी केशवपनबंदीची बाजू उचलून धरली. १४ एप्रिल १८९० रोजी मुंबईच्या एल्फिन्स्टन माध्यमिक शाळेच्यामागे नाभिकांची विराट सभा झाली. सदोबा कृष्णाजी यांनी अध्यक्षस्थान भूषवले. या सभेत काळजाला हात घालणारी, हृदय हेलावणारी भाषणे झाली. गद्रे आणि केळकर यांनी पुढाकार घेतला म्हणून सनातन्यांनी त्यांच्यावर शिव्याशापांचा वर्षाव केला. सत्यशोधक कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईत न्हाव्यांचा संप घडवून आणण्याच्या कामी खूप मेहनत घेतली.

महात्मा फुलेंनी सुरु केलेला लढा त्यांच्यानंतर देखील प्रदिर्घ काळ चालला मात्र विधवा केशवपनाची प्रथा महाराष्ट्रातून संपूर्णपणे मोडून निघाली. हे एक क्रांतिकारी पाऊल ठरले.

जोतिबा फुले आणि सत्यशोधक समाजाचे नेते यांची चळवळ अधिकाधिक उपेक्षित, दुर्लक्षित लोकांपर्यंत पोहोचली. त्यांच्याविषयी लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला. समाजातील अनेक आर्थिक प्रश्न याच वर्णाधिष्ठीत व्यवस्थेने निर्माण केले होते. त्याच्या विरुद्ध लढा देण्यासाठी इंग्रजी राजवटीमध्ये संघटना, चळवळी, संप या संकल्पना येथे रुजल्या. महात्मा फुलेंच्या मार्गदर्शनाखाली तरुण सत्यशोधक पुढाऱ्यांच्या नेतृत्वाखाली निरनिराळ्या भागांमध्ये निरनिराळ्या प्रश्नांवर लढे सुरू झाले. लोकांमध्ये जागृती वाढली. आपले अधिकार कळले.

या प्रेरणेनेच पुढे जातिव्यवस्थेमध्ये सर्वात कनिष्ठस्थानी ढकलण्यात आलेल्या भंगी समाजाने मुंबई नगरपालिकेत इ.स. १८८९च्या जून आणि जुलै महिन्यात त्यांच्या मागण्यांसाठी दोन वेळा संप केला.

संपाच्या हत्याराचा वापर कामगारांच्या फायद्यासाठी करण्यासोबतच त्यातून सामाजिक क्रांतीचा महात्मा फुलेंनी केलेला प्रयोग हा अभिनवच मानला पाहिजे. सध्याच्या काळात होणारे संप, त्यांचे नेते, सत्ताधारी वर्ग यांनी आज महात्मा फुलेंच्या जयंतीदिनी यातून शिकवण घेतली पाहिजे हे नक्की.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com