अध्यापनापेक्षा कारकुनी कामांचेच ओझे! ऑनलाइन नोंदी, ‘बीएलओ’ला वैतागले शिक्षक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

School
अध्यापनापेक्षा कारकुनी कामांचेच ओझे! ऑनलाइन नोंदी, ‘बीएलओ’ला वैतागले शिक्षक

अध्यापनापेक्षा कारकुनी कामांचेच ओझे! ऑनलाइन नोंदी, ‘बीएलओ’ला वैतागले शिक्षक

सोलापूर : शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षकांनी दररोज किमान सहा तास अध्यापन करणे अपेक्षित आहे. शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय शैक्षणिक उपक्रम, प्रशिक्षणे तथा सर्वेक्षणाची कामे शिक्षकांना देऊ नयेत, असे २४ फेब्रुवारी २०२२ रोजी शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. तरीदेखील शिक्षकांना अध्यापनापेक्षा कारकुनी कामेच अधिक करावी लागत असल्याचा थेट परिणाम मुलांच्या गुणवत्तेवर झाला आहे.

पावलोपावली झालेल्या खासगी अनुदानित व इंग्रजी माध्यमाच्या शाळांशी स्पर्धा करताना जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पटसंख्या कमी होऊ लागली आहे. पटसंख्येअभावी दरवर्षी शेकडो शिक्षक अतिरिक्त होत आहेत. सद्य:स्थितीत जिल्हा परिषदेच्या जवळपास ८९ शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी झाली आहे. इंग्रजी माध्यमाची साडेनऊशे मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल झाल्याचे आवर्जून सांगणाऱ्या अधिकाऱ्यांना इतर शाळांमधील पटसंख्या घटल्याचे दिसलेले नाही, हे विशेष. पटसंख्या कमी होण्यासाठी ‘गुणवत्ता’ हेच प्रमुख कारण राहिले आहे. तरीदेखील अध्यापनाशिवाय शिक्षकांना विविध उपक्रम राबविण्याची सक्ती केली जात आहे. तसेच निवडणूकपूर्व कामांची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली जात आहे. दुसरीकडे, शासकीय योजनांच्या अंमलबजावणीनंतर त्याच्या नोंदीची कामेदेखील शिक्षकांनाच करावी लागत आहेत. ज्या झेडपी शाळांमध्ये मुलांच्या गुणवत्तेचा पाया भक्कम केला जातो, तेथेच गुणवत्तेकडे दुर्लक्ष झाल्यास मुलांचे भवितव्य काय, याचे उत्तर भविष्यात अधिकाऱ्यांना द्यावे लागणार आहे.

अध्यापनाशिवाय शिक्षकांवरील अतिरिक्त कामे

  • - ‘बीएलओ’ म्हणून मतदार नोंदणी, दुबार अन्‌ मयत मतदारांचा शोध घेणे व मतदान जनजागृती

  • - माध्यान्ह भोजनाच्या नोंदी ठेवणे, लसीकरण

  • - दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांचा गावोगावी सर्व्हे करणे

  • - सुलभ शौचालयांचा सर्व्हे करणे, शाळाबाह्य मुलांचा शोध घेणे

  • - जंतनाशक गोळ्यांचे वाटप करून त्याची नोंद ठेवणे

  • - अल्पसंख्याक व समाजकल्याणच्या योजनांतर्गत विद्यार्थ्यांचे अर्ज भरणे

  • - विद्यार्थी लाभ व शाळा अनुदानासाठी सातत्याने वेगवेगळ्या बॅंकांमध्ये खाते उघडणे

शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षकांनी नैसर्गिक आपत्ती, प्रत्यक्ष निवडणूक व जनगणना एवढीच कामे करणे अपेक्षित आहे. तरीदेखील वरिष्ठ अधिकारी शिक्षकांवर अतिरिक्त कामांचा बोजा टाकत आहेत. त्यामुळे अध्यापनापेक्षा शिक्षकांना बाकीच्याच कामांसाठी वेळ द्यावा लागत आहे. गुणवत्ता वाढविणे व टिकविण्यासाठी हा प्रकार थांबायला हवा.

- म. ज. मोरे, कार्यकारी अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य

२००९ पासून नाही शिक्षक भरती

राज्यात तब्बल १२ वर्षांपासून शिक्षक भरती झालेली नाही. त्यामुळे अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये मुलांच्या प्रमाणात शिक्षकांची संख्या अपुरी पडू लागली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जवळपास ४०० शिक्षकांची पदे रिक्त आहेत. दुसरीकडे, केंद्र प्रमुखांची १९० पैकी १६९ पदे रिक्त आहेत. विज्ञान, गणित विषयाला त्या विषयातील पदवीधर शिक्षकदेखील अपुरेच आहेत. अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापक नसल्याने शिक्षकच प्रभारी मुख्याध्यापकाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Web Title: The Burden Of Clerical Work Than Teaching Online Records Teachers Upset With Blo

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..