Property law: मुलीला-सुनेला संपत्तीत वाटा मिळतोच! वडिलांच्या प्रॉपर्टीत मुलींना, पतीच्या संपत्तीत पत्नीला हिस्सा देत नसल्यास... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

proprety law
मुलीला-सुनेला संपत्तीत वाटा मिळतोच! वडिलांच्या प्रॉपर्टीत मुलींना, पतीच्या संपत्तीत पत्नीला हिस्सा देत नसल्यास...

Property law: मुलीला-सुनेला संपत्तीत वाटा मिळतोच! वडिलांच्या प्रॉपर्टीत मुलींना, पतीच्या संपत्तीत पत्नीला हिस्सा देत नसल्यास...

सोलापूर : वडिलांच्या मृत्यूनंतर किंवा हयातीत ज्यावेळी संपत्तीच्या वाटण्या होतात, त्यावेळी मुली हक्कसोड पत्र करून भावांच्या नावाने जमीन तथा संपत्ती करू शकतात. त्यावेळी त्यांना स्वत:ला हिस्सा हवा असल्यास त्या हक्काने मागू शकतात.

मुलगी आणि सुनेचा वडील आणि सासऱ्यांच्या प्रॉपर्टीत हक्क असतो. हिंदू उत्तराधिकार (संशोधन) अधिनियम, २००५ नुसार मुलींना संपत्तीचा समान अधिकार देण्यात आला आहे. तर सुनेला प्रॉपर्टीमध्ये आपल्या नवऱ्याच्याच प्रॉपर्टीत हक्क मिळतो. (Latest Marathi News)

परंतु, ‘मुलगी लग्न होऊन दुसऱ्या घरी जाणार, त्यामुळे तिचा या संपत्तीवर अधिकार नाही’ ही मानसिकता अजून कायम आहे. ‘मुलगी म्हणजे परक्याचं धन’ ही संकल्पना खोलवर रुजलेली आहे. अनेक महिलांना माहेरच्या संपत्तीमध्ये हिस्सा मागणे चुकीचे वाटते.

तर काहींना वाटते हिस्सा मागितला तर माहेरच्यांशी संबंध बिघडतील. तर अनेक महिलांना हिस्सा दिलाच जात नाही, त्यांच्यावर त्यासाठी दबाव आणला जातो. (Marathi Tajya Batmya)

मुलींना वडिलांच्या संपत्तीत हक्क

प्रत्येक कुटुंबात मुलीचा आई-वडिलांच्या प्रॉपर्टीवर समान हक्क असतो. मुलगी विवाहित असो की विधवा किंवा घटस्फोटीत, तरीसुद्धा ती आई वडिलांच्या घरी राहण्याचा हक्क मागू शकते.

एवढेच काय तर प्रॉपर्टीमधील संपत्तीवर मुलीचा पूर्ण अधिकारही असतो. जर वडिलांनी वारसपत्रात मुलीचे नाव लिहिले नसेल, तर तिला संपत्तीचा अधिकार मिळत नाही. पण, वडिलांचा वारसपत्र न लिहिताच मृत्यू झाला असेल तर तिला तिच्या भावंडासारखा संपत्तीत समान अधिकार मिळतो.

सुनेचा सासरच्या संपत्तीत हक्क

हिंदू उत्तराधिकार (संशोधन) अधिनियम, २००५ नुसार सुनेला संपत्तीमध्ये कमी अधिकार मिळाले आहेत. सासू- सासऱ्यांच्या संपत्तीत सुनेला कोणताही अधिकार नसतो. ती फक्त नवऱ्याच्या संपत्तीवर अधिकार मिळवण्याचा दावा करू शकते.

हिंदू वारसा हक्क कायद्याने विधवा महिलेला पतीच्या वडिलोपार्जित संपत्तीत मुलांच्या बरोबरीने अधिकार मिळतो. तसेच पतीच्या स्वतंत्र संपत्तीमध्ये, त्याने मृत्युपत्र केलेले नसल्यास, मुले आणि सासूच्या बरोबरीने हक्क मिळतो.

परंतु, प्रत्यक्षात अनेकदा विधवा महिलांच्या नावावर जमीन करून देण्यास कुटुंबाचा विरोध असतो. विशेषतः महिलेचे वय कमी असेल, मुले लहान असतील किंवा नसेलच, तर अशावेळी त्यांना त्यांच्या नवऱ्याच्या जमिनीमधील हक्कापासून वंचित ठेवले जाते. अशावेळी ते न्यायालयातून हक्क मागू शकतात.

‘ती’ला नाही पण, मुलाला वाटणी मागण्याचा अधिकार

‘हिंदू वारसाहक्क (दुरुस्ती) अधिनियम, २००५’नुसार, एखादा हिंदू पुरुष मृत्युपत्र न करताच मरण पावला, तर त्याच्या स्वकष्टार्जित मालमत्तेवर त्याच्या मुलाएवढाच मुलींचाही (सर्व वारसांचा) हक्क असेल. त्यात मुलगी विवाहित आहे अथवा नाही, याचा विचार होत नाही.

परित्यक्ता महिलांना पतीच्या संपत्तीमध्ये अधिकार मिळवणे विधवा महिलांपेक्षाही कठीण होते. हिंदू वारसा हक्क कायद्याप्रमाणे पतीच्या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये पत्नीला दोन प्रकारे हक्क मिळतो. पतीच्या मृत्यूनंतर त्याची वारस म्हणून, तसेच पतीच्या हयातीमध्ये संपत्तीच्या वाटण्या झाल्यास, मात्र वाटणी मागण्याचा हक्क तिला नाही.

अपत्यांना जन्माने वडिलोपार्जित संपत्तीमध्ये हक्क असल्याने वडिलांकडे वाटणीची मागणी करू शकतात. त्यामुळे बहुतेक परित्यक्ता महिलांना पतीच्या जमिनीमध्ये सहजासहजी हक्क मिळत नाही, अशी वस्तुस्थिती आहे.

वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे काय?

संपत्ती दोन प्रकारची असते. एक म्हणजे तुम्ही स्वत: कमावलेली आणि दुसरी वडिलोपार्जित. कोणत्याही पुरुषाला आपल्या वडिलांकडून, आजोबाकडून किंवा पणजोबांकडून जी संपत्ती प्राप्त होते, त्याला वडिलोपार्जित संपत्ती म्हणतात. जन्मानंतर त्या मुलाचा

वडिलोपार्जित संपत्तीवर हक्क स्थापित होतो. स्वत: कमावलेली संपत्ती तो व्यक्ती त्याच्या इच्छेनुसार कोणालाही देऊ शकतो.

कोर्टातून निश्चितपणे मिळतो न्याय

स्वत: कमावलेली संपत्ती कोणाला द्यायची किंवा कोणाला नाही हे ठरविण्याचा अधिकार संबंधित व्यक्तीचा असतो. पण, हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार वडिलोपार्जित संपत्तीत मुलींसह सर्वच वारसांना समान हिस्सा मिळतोच. सुनेलाही पतीच्या वडिलोपार्जित इस्टेटीत व पतीच्या संपत्तीत हिस्सा मिळतो. कोणी तिचा अधिकार डावलत असल्यास कोर्टातून तिला निश्चितपणे न्याय मिळतो.

- जयदीप माने, विधिज्ञ, सोलापूर