
Nana Patole : पटोले-थोरातांमधील वाद मिटला! पक्षाच्या बैठकीत दोन्ही नेत्यांच्या शेजारी बसून गप्पा
अनेक नाट्यमय घडामोडी, नाराजी यांच्यानंतर काल पहिल्यांदाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यात अखेर मनोमिलन झाल्याचे चित्र दिसून आलं. बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले या दोन्ही नेत्यांनी बुधवारी प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीला हजेरी लावली. बैठकीमध्ये दोन्ही नेते एकमेकांच्या शेजारीच बसलेले दिसून आले होते. बैठकीमध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आमच्यामध्ये कोणताही वाद नसून आम्ही एकत्रच असल्याचे यावेळी जाहीर केलं आहे.
तर नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. सत्यजित तांबे आणि प्रकरणावर आपलं मन दुखावल असल्याचं थोरात म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या गटनेते पदाचा राजीनामा दिला होता.
या सर्व घडामोडीनंतर महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनी थोरात यांची भेट घेऊन या प्रकरणी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन मनधरणी करण्याचा बुधवारी मुंबईत पार पडलेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बाळासाहेब थोरात या बैठकीला उपस्थित राहतील का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होतं. मात्र या बैठकीत या दोन्ही नेत्यांनी शेजारी बसत मनमुराद गप्पा मारत दुरावा मिटल्याचे संकेत देत काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे दिसून आले.
यावेळी काँग्रेसचे सर्व जेष्ठ नेतेही उपस्थित होते. तर सर्व काही ठीक आहे. आम्ही सत्यजित तांबे आणि बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करू त्याचबरोबर कोणताही राजीनामा किंवा पत्र न मिळल्याचंही नाना पटोले यांनी काल म्हंटलं होतं.