
Solapur Crime News: राज्यातील पहिलीच शिक्षा! गुप्तांग कापून खुनाचा प्रयत्न; तिघांना ३० वर्षाची सक्तमजुरी व ३० लाखांच्या भरपाईचे आदेश
Solapur News : जेवायला जाण्याचा बहाणा करून जेवणानंतर निर्जनस्थळी नेऊन विश्वासघाताने तिघांनी फिर्यादीचे गुप्तांग कापले.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. शब्बीर औटी यांनी तिन्ही आरोपींना ३० वर्षांची सक्तमजुरी व प्रत्येकी ५० हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच जखमी फिर्यादीला ३० लाखांची भरपाई देण्याचेही आदेश दिले
सरकारी वकिलांचा जोरदार युक्तीवाद
फिर्यादी जीवनात कधीच सामान्य माणसाप्रमाणे उपभोगू शकत नाही. त्यामुळे जखमीस जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी म्हणत सरकारी वकिल माधुरी देशपांडे व नागनाथ गुंडे यांनी उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे सादर केले.
तो युक्तीवाद ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. औटी यांनी आरोपींना शिक्षा ठोठावली. मूळ फिर्यादीतर्फे ॲड. हुसेन बागवान यांनी तर आरोपींतर्फे ॲड. रियाज शेख यांनी काम पाहिले. कोर्टपैरवी म्हणून दिनेश कोळी यांनी मदत केली.
न्यायाधीशांकडून १५ दिवसांत निकाल
आरोपींतर्फे या गुन्ह्याचा निर्णय लवकर व्हावा म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांकडे विनंती अर्ज करण्यात आला होता.
१३ फेब्रुवारी रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. औटी यांनी या गुन्ह्याचा तपासणी सुरु केली आणि २८ फेब्रुवारीला त्याचा निकालही दिला. तिन्ही आरोपींचा फिर्यादीला जीवे ठार मारण्याचा उद्देश होता.
अतिशय निर्घुणपणे हे कृत्य करून आरोपींनी फिर्यादीच्या जीवनात अपरिमित असे नुकसान केले आहे. या पार्श्वभूमीवर आरोपींना शिक्षा ठोठावली. खूनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात एवढी मोठी शिक्षा देण्याची राज्यातील ही पहिलीच घटना असावी, असे सरकारी वकिलांनी सांगितले.