अवसरीत दानपेटी फोडून अडीच लाखांच्या ऐवजाची चोरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

मंचर - अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी (ता. ३) पहाटे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराच्या लोखंडी दरवाजाचे कडीकोयंडे तोडून चोरट्यांनी मंदिरातील ७५ किलो वजनाची दान पेटी चोरून नेली. दानपेटीत रोख रक्कम व सोन्या चांदीचे नवसाचे दागिने असा अडीच लाख रुपये रकमेचा ऐवज असल्याचा अंदाज गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

मंचर - अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी (ता. ३) पहाटे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराच्या लोखंडी दरवाजाचे कडीकोयंडे तोडून चोरट्यांनी मंदिरातील ७५ किलो वजनाची दान पेटी चोरून नेली. दानपेटीत रोख रक्कम व सोन्या चांदीचे नवसाचे दागिने असा अडीच लाख रुपये रकमेचा ऐवज असल्याचा अंदाज गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

दरम्यान, अजून एक दान पेटी फोडण्याचा प्रयत्न झाला. तसेच गाभाऱ्याच्या दरवाजाचे कुलूप न तुटल्यामुळे तिजोरीतील २५ लाख रुपये किमतीचे सोन्या, चांदीचे दागिने शाबूत राहिले आहेत. दोन चोरट्यांची छायाचित्रे कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. २१ मिनिटे चोरटे मंदिरात होते. मंदिराजवळ ३०० फूट अंतरावर असलेल्या लिंगायत समाजाच्या दफन भूमीत दान पेटी मिळाली आहे. मंदिराजवळ राहणाऱ्या मुलाणी कुटुंबाला सकाळी मंदिराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी माजी सरपंच रामदास भोर पाटील यांना घटना सांगितली. 

रामदास भोर, पुजारी तुकाराम खेडकर व ट्रस्टी आनंदराव पाटील मंदिरात पहाटे पावणेपाचच्या सुमारास आल्यानंतर त्यांना तेथे तिजोरी दिसली नाही. त्यांनी मंचर पोलिसांना चोरी झाल्याची घटना कळवली. सरपंच सुनीता कराळे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सुरेश भोर, दगडू मारुती शिंदे, सुरेश वायाळ, नीलेश टेमकर, रामदास भोर यांनी चोरट्यांचा शोध पोलिसांनी लावावा, अशी मागणी केली आहे. 

खेड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी राम पठारे, ठसे तज्ज्ञ पोलिस निरीक्षक पी. आर. वाघ, मंचरचे पोलिस हवालदार सागर गायकवाड, नवनाथ नाईकडे, चंदू विठ्ठल वाघ यांनी पाहणी केली. पुण्याहून श्वानही मागविले होते. पठारे म्हणाले, ‘‘चोरट्यांनी पाळत ठेवून चोरी केली अशी शक्‍यता गृहीत धरून तपास सुरू आहे. नट काढून तिजोरी उचलून मंदिराबाहेर नेली आहे. सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. दोन चोरट्यांची रेखाचित्र तयार केली जातील. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक कार्यरत केले आहे.’’

सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी 
पाच वर्षांपूर्वी श्री काळ भैरवनाथ मंदिरातून देवाचा चांदीचा मुखवटा व महिरप चोरून नेला होता. चोरीनंतर चोरट्यांच्या शोधासाठी गावकऱ्यांनी आंदोलनही केले होते. मंचर पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेऊन सहा किलो चांदी हस्तगत केली होती. चोरीचे प्रकार टाळण्यासाठी सुरक्षा रक्षक किंवा धोक्‍याची सूचना देणारा सायरन बसवावा, दान पेटी उघडून पैसे व दागिने बॅंकेत ठेवावेत, अशी मागणी भक्तांनी व काही ट्रस्टींनी केली होती. ट्रस्टमध्ये वादंग आहे. वादंगामुळे निर्णय होत नाहीत त्याचा फायदा चोरट्यांनी घेतला असल्याची चर्चा सुरू होती. विशेष म्हणजे पूर्वी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांनीच तिजोरी उचलून नेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. 

‘...तर चोरीचा प्रकार टळला असता’
भैरवनाथ ट्रस्टचे अध्यक्ष विद्यासागर नाईक म्हणाले, ‘‘सचिव आनंदराव भोर पाटील यांचे मला अजिबात सहकार्य मिळत नाही. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेबाबत कुठलाही निर्णय घेता येत नाही. नुकत्याच झालेल्या ट्रस्टच्या बैठकीत दान पेटी उघडावी असा विषय होता. पण काही जणांनी बैठकीत गोंधळ घातला. त्यामुळे दान पेटी उघडण्याच्या विषयावर चर्चा झाली नाही. जर दान पेटी उघडली असती तर चोरीचा प्रकार टळला असता. यापुढे मला गावकऱ्यांनी ठोस निर्णय घेण्यासाठी सहकार्य करावे.

Web Title: Theft in manchar